'बुलेट ट्रेन'चा 'डीपीआर' बनविण्याच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 12:03 PM2021-07-21T12:03:35+5:302021-07-21T12:03:50+5:30

DPR of the bullet train : जीपीएस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यातील ५३ गावांमधून हा मार्ग प्रस्तावित आहे.

Speed up the movement to make the DPR of the bullet train | 'बुलेट ट्रेन'चा 'डीपीआर' बनविण्याच्या हालचालींना वेग

'बुलेट ट्रेन'चा 'डीपीआर' बनविण्याच्या हालचालींना वेग

Next

- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसंदर्भाने मध्यंतरी झालेल्या लीडार सर्वेक्षणानंतर आता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) अर्थात विस्तृत प्रकल्प अहवाल बनविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासंदर्भाने जिल्हाधिकारी कार्यालयात २२ जुलै रोजी एका बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
देशातील सात प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या मार्गापैकी मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन हा एक महत्त्वाचा तथा ७५३ किमी लांबीचा हा मार्ग आहे. जीपीएस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यातील ५३ गावांमधून हा मार्ग प्रस्तावित आहे. त्यानुषंगाने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयास एक पत्र प्राप्त झाले होते. त्याच्या आधारावर आता सार्वजनिक सुनावणीच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गावर पर्यावरण आणि सामाजिक स्तरावर पडणाऱ्या प्रभावाचे मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयात २२ जुलै रोजी ही बैठक होत आहे. 
थोडक्यात मुंबई-नागपूर हा हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर (एचएसआर) विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून या सर्व हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यानुषंगाने हा कॉरिडॉर विकसित करण्याच्या दृष्टीने बुलडाणा जिल्ह्याच्या संदर्भाने जीपीएस टेक्नॉलॉजी सध्या काम करत आहेत. त्यानुषंगाने पर्यावरण व सामाजिक मूल्यांकनाचा अभ्यास करण्याचे काम या संस्थेने हाती घेतले आहे.
२२ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या यासंदर्भातील बैठकीत संभाव्य मार्ग, स्थानक पर्यावरण आणि सामाजिक स्तरावर याचे काय फायदे, तोटे होतील यासंदर्भाने हा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी जीपीएस टेक्नॉलॉजीचे तीन सदस्यीय पथकही बुलडाण्यात २० जुलै रोजीच दाखल झालेले आहे.

प्रस्तावित मार्ग ‘समृद्धी’लगत
मुंबई-नागपूर हा हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर समृद्धी महामार्गाला समांतर नेण्याचे तूर्तास प्रस्तावित आहे. प्रसंगी पर्यावरणीय व सामाजिक मूल्यांकनानंतर यात बदलही होऊ शकतो. मात्र तूर्तास बुलडाणा जिल्ह्यातील साधारणत: ५३ गावांजवळून हा मार्ग प्रस्तावित आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील बेलगाव, गोहेगाव, डोणगाव, आंध्रूड, अंजनी बुद्रुक, शहापूर, पिंप्री माळी, साब्रा, फैजपूर,  गवंढाळा, कल्याणा, मेहकर, बरटाळा, शिवपुरी, पारडा, काळेगाव,, कुंबेफळ,  वर्दडी खुर्द, दुसरबीड, राहेरी खुर्द, किनगाव राजा, शेलगाव राऊत, पळसखेड चक्का, पळसखेड  मलकदेव, तुळजापूर, गोळेगाव, सावरगाव माळ यासह अन्य काही गावांचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे.


जागतिक बँकेचे अर्थसाहाय्य
जागतिक बँकेच्या साहाय्याने हा हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. पर्यावरणीय व सामाजिक मूल्यांकनासंदर्भाने अभ्यास झाल्यानंतर या प्रकल्पाचा विस्तृत अहवाल बनविण्यात येऊन तो जागतिक बँकेला सादर केला जाईल. त्या आधारावर या मार्गाची आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय वस्तुस्थिती विचारात घेऊन पुढील बाबी निश्चित केल्या जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पर्यावरणीय व सामाजिक मुल्यांकन करणार
मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसीत करण्याचे प्रस्तावीत आहे. त्यादृष्टीने डीपीआर बनविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्याचा पर्यावरणीय आणा सामाजिक मुल्यांकनाचा अभ्यास हाती घेण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात २२ जुलै रोजी बैठक होत आहे.
- भूषण अहिरे, 
उपजिल्हाधिकारी, बुलडाणा

Web Title: Speed up the movement to make the DPR of the bullet train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.