भरधाव दुचाकी रस्त्याच्या कठड्यावर धडकली; एक ठार, दाेन गंभीर
By संदीप वानखेडे | Published: May 12, 2023 04:29 PM2023-05-12T16:29:44+5:302023-05-12T16:30:52+5:30
चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात : देऊळगाव मही ते डिग्रस रस्त्यावरील घटना.
देऊळगाव मही (बुलढाणा): चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यावर धडकली. यामध्ये १५ वर्षीय बालक ठार तर दाेन जण गंभीर जखमी झाले. ही घटना १२ मे राेजी देऊळगाव मही ते डिग्रस रस्त्यावर घडली. पवन संताेष देव्हडे (रा. वरुड बुद्रूक, ता. जाफ्राबाद, जि. जालना) असे मृतकाचे नाव आहे़
देऊळगाव मही येथे हाेत असलेल्या चुलत भावाच्या लग्नासाठी आलेले तीन मित्र दुचाकी क्र. एमएच २१ एवाय ९४१२ ने देवीच्या दर्शनासाठी शुक्रवारी जात हाेते. दरम्यान, डिग्रस रस्त्यावर समाेर गेल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यावर आदळली. यामध्ये दुचाकीवरील पवन संतोष देव्हडे, हर्षल दत्ता देव्हडे (दाेघे राहणार वरुड बु., ता. जाफ्राबाद. जि. जालना) व प्रदीप पप्पू गवारे (वय १८, रा. साखरखेर्डा) आदी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान पवन देव्हडे याचा मृत्यू झाला, तर अन्य दाेघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जालना येथे हलविण्यात आले आहे.
आनंदाचा क्षण बदलला दु:खात
देऊळगाव मही येथे शुक्रवारी सायंकाळी नितीन देव्हडे यांचा विवाह साेहळा आयाेजित करण्यात आला हाेता. याच साेहळ्यासाठी तिघेही आले हाेते. दरम्यान, सायंकाळी विवाह साेहळ्यापूर्वीच नवरदेवाचा चुलत भाऊ असलेला पवन देव्हडे याचा मृत्यू झाल्याने विवाह साेहळ्यावर विरजण पडले. सकाळपासूनच विवाहाची तयारी सुरू असतानाच या अपघाताचे वृत्त धडकले. आनंदाचा क्षण काही वेळातच दु:खात बदलला.