खामगावजवळ भरधाव कार एकमेकांवर आदळल्या; भीषण अपघातात पाच जण जखमी
By अनिल गवई | Published: December 3, 2024 12:15 AM2024-12-03T00:15:14+5:302024-12-03T00:16:34+5:30
खामगाव-शेगाव रस्त्यावरील जयपूर लांडे फाट्यासमोरील घटना; वळणमार्ग बनतेय अपघातप्रवण स्थळ
अनिल गवई, खामगाव - जि. बुलढाणा : भरधाव कार विरुद्ध दिशेने येत असलेल्या कारवर आदळल्याने झालेल्या अपघातात दोन्ही कारमधील पाच जण जखमी झाले. सोमवारी सायंकाळी ७:३० वाजेदरम्यान ही घटना खामगाव-शेगाव रस्त्यावरील जयपूर लांडे फाट्यासमोरील वळणावर घडली. दरम्यान, याच ठिकाणी दोन दुचाकीचाही अपघात झाल्याने तिघे जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. यात दोन्ही कारमधील पाच जण, तर दोन दुचाकीस्वारांसह एकाचा समावेश असल्याचे समजते.
प्राप्त माहितीनुसार, एमएच ३०, बीएल- २०७० या क्रमांकाची कार खामगाव येथून शेगाव येथे जात होती. दरम्यान, त्याचवेळी विरुद्ध दिशेने एमएच-२७, डीएल-९७३२ क्रमांकाची कार शेगावकडून राष्ट्रीय महामार्गाने गुजरातकडे जाण्यासाठी येत होते. त्यावेळी महामार्गाच्या पोचरस्त्याच्या काही अंतरावर दोन्ही कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये परतवाडा येथील एकाच कुटुंबातील प्रेमलता ठाकूर (६४), सुरेशसिंह ठाकूर (६८), प्रिया ठाकूर (२८), सर्व रा. परतवाडा तिघे गंभीर जखमी झाले, तर दुसऱ्या कारमधील लखन नथ्थानी, हरलीन नथ्थानी हे दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. यातील ठाकूर कुटुंबातील तिघांना खामगाव येथील सर्वोपचार रुग्णालयातील उपचारानंतर अकोला येथे हलविण्यात आले, तर नथ्थानी कुटुंबातील दोघांना खामगाव येथील दोन वेगवेगळ्या खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
दुचाकी अपघातातील एकाची प्रकृती चिंताजनक
भरधाव कारचा अपघात झाल्यानंतर काही वेळातच घटनास्थळी दोन दुचाकींचाही विचित्र अपघात झाला. यात एमएच-२८, बीएक्स-७८३५ या दुचाकीवरील प्रशांत श्रीकृष्ण पवार, रा. गोळेगाव, तर सुरेश शंकरराव मांगे, रा. मुकीनपूर यांच्यासह आणखी एक जण जखमी झाला. दुचाकी अपघातातील पवार आणि मांगे यांनाही अकोला येथे दोघांनाही अकोला येथे हलविण्यात आले.
वळणमार्ग बनतेय अपघातप्रवण स्थळ
खामगाव शेगाव रोडवरील जयपूर लांडे फाट्यासमोरील वळण मार्ग अपघातप्रवण स्थळ बनत असल्याचे दिसून येते. या ठिकाणी गत काही दिवसांत तीन ते चार अपघात घडल्याचे समोर येत आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी घडलेल्या अपघातातील एमएच- ३०, बीएल- २०७० ही कार दुसऱ्या कार आदळल्यानंतर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने रोडखाली काही अंतरावर जाऊन झाडाला अडकली. दोन्ही वाहनांतील एअर बॅग उघडल्यानंतर पुढील अनर्थ टळल्याची चर्चा आहे.