इको फ्रेण्डली कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Published: July 22, 2014 12:10 AM2014-07-22T00:10:21+5:302014-07-22T00:10:21+5:30
लोकमत सखी मंचचा उपक्रम
जळगाव जामोद : लोकमत सखी मंचच्यावतीने जळगाव जामोद येथे टाकाऊपासून टिकाऊ या इको फ्रेण्डली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. अनिल सातव यांच्या ट्युशन हॉलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यशाळेची सुरुवात श्री संत गजानन महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी झी. टीव्ही फेम नीताताई बोबडे यांनी उपस्थित सखी मंच सदस्य व इतर महिलांना टाकाऊ वस्तूंपासून विविध कलात्मक टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या, याचे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत इको फ्रेण्डली ज्वेलरी अंतर्गत गवताचे मोती, शंखांची ज्वेलरी, गुंजची ज्वेलरी सोबतच इको फ्रेण्डली फ्लॉवर मेकिंग, नवीन फॅशनेबल स्टोल, गवत व भोपळ्यापासून दिवाणखान्यातील फ्लॉवर पॉट, शंख व शिंपल्यांपासून शोभिवंत दागिने याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच मानवाला अपायकारक असलेल्या पॉलिथीनपासून केसांमध्ये लावण्याचे सुंदर गजरे कसे तयार होतात, याचेही प्रशिक्षण नीताताई बोबडे यांनी या कार्यशाळेत दिले. प्रास्ताविक वंदनाताई कांडलकर यांनी केले. यावेळी विशेष सहकार्याबद्दल प्रा. अनिल सातव व अनुराधा सातव यांचा सखी मंचच्यावतीने नगरसेविका सविताताई देशमुख व सुचिताताई देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेचे संचालन स्मिताताई पवार यांनी केले, तर प्रीतीताई गट्टाणी यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी सर्व सखी मंच सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेकरिता महिलांचा मोठा प्रतिसाद होता.(तालुका प्रतिनिधी)