शेतकरी संप आंदोलनास घाटाखाली उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Published: June 6, 2017 12:20 AM2017-06-06T00:20:31+5:302017-06-06T00:20:31+5:30

बंदला संमिश्र प्रतिसाद : रस्त्यावर कांदे फेकून रास्ता रोको आंदोलन

Spontaneous response under the deficit of farmers' agitation | शेतकरी संप आंदोलनास घाटाखाली उत्स्फूर्त प्रतिसाद

शेतकरी संप आंदोलनास घाटाखाली उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, शेतमालास योग्य हमीभाव, या व इतर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सर्वपक्षीयांच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलकांनी कमी भावामुळे सडणारा कांदा रस्त्यावर फेकून आपला रोष व्यक्त करीत राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला स्थानबद्ध केल्यानंतर सुटका करण्यात आली. आंदोलन खामगाव तालुक्यात खामगाव, पिंप्री गवळी, लाखनवाडा या व इतर ठिकाणी करण्यात आले. तसेच जळगाव जामोद तालुक्यात पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जळगाव शहरासह आसलगाव, पिंपळगाव काळे, जामोद इत्यादी गावांमध्ये शेतकऱ्यांनी शांततेत आणि कडकडीत बंद पाळला. शेतकऱ्यांच्या संपाला प्रतिसाद म्हणून आजच्या बंदमध्ये शेतकरी संघटना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राकाँ, भाकप, माकप, भारिप-बमसं आणि शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
जळगाव शहरात व्यापारी संघटनेच्या सहकार्याने १०० टक्के बंद यशस्वी करण्यात आला. दिवसभर दुकाने बंद ठेवण्यात आली.
संग्रामपूर तालुक्यात संग्रामपूर सोबतच वरवट बकाल, सोनाळा, टुनकी येथे पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.
संग्रामपूर येथे दुपारी २ वाजेपर्यंत सर्वच प्रतिष्ठाने बंद होती. या बंदमुळे शहरात शुकशुकाट होता. या संपामध्ये सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी भाजपा सरकारविरोधात नारेबाजी करीत रोष व्यक्त केला. यावेळी पहिल्यांदाच शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून संपामध्ये सहभागी होत असताना दिसून आला. आंदोलन यापुढेदेखील सुरु ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
मलकापुरातही आंदोलनात संमिश्र प्रतिसाद लाभला. विविध राजकीय पक्ष तथा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या संपाला पाठिंबा दर्शवित ५ जून रोजी सकाळी रस्त्यावर उतरून बाजारात फिरुन व्यावसायिकांची दुकाने बंद ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत शहर पोलीस स्टेशनला आणून स्थानबद्ध केले. त्यामुळे संपाची धग कायम असली, तरी या संपाचा परिणाम शहरातील बाजारपेठेवर पूर्णपणे जाणवला नाही. शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शवित भाराकाँ, राकाँ, शिवसेना, शेतकरी संघटना, प्रहार, भारत मुक्ती मोर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड आदी राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत बाजारपेठ बंदचे आवाहन करीत व्यावसायिकांची दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड येथेही बंदला प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबतच शेतकऱ्यांचा सहभाग होता. रस्त्यावर कांदा व भाजीपाला फेकून शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

 

Web Title: Spontaneous response under the deficit of farmers' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.