पावसाअभावी पिकांवरील फवारणी ठरतेय ‘फेल’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 03:33 PM2019-07-21T15:33:40+5:302019-07-21T15:34:18+5:30
तणाचा नायनाट करण्याकरीता शेतकरी तणनाशक फवारणी करत आहेत; मात्र पावसाअभावी पिकांवरील ही फवारणीही फेल ठरत आहे.
ब्रम्हानंद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शेतात तणाचा जोर वाढला असून पिकांना मात्र धोका निर्माण झाला आहे. ह्या तणाचा नायनाट करण्याकरीता शेतकरी तणनाशक फवारणी करत आहेत; मात्र पावसाअभावी पिकांवरील ही फवारणीही फेल ठरत आहे. फवारणीसाठी आवश्यक ओलावाच जमीनीत राहिला नसल्याने शेतकºयांचे महागडे औषध पिकालाच मारक ठरत आहे.
जिल्ह्यात ७ लाख ३८ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी ८५ टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रावरी खरीपाची पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या १५ दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे या पिकांमध्ये तणाचे प्रमाणही झपाट्याने वाढले. अत्यंत कमी पावसातही शेतात तण वाढू शकते, त्यामुळे शेतामध्ये पिकांपेक्षा आढाव तणच अधिक दिसून येत आहे. हे तण नष्ट करण्याकरीता शेतकरी महागडे तणनाशक फवारणी करताना दिसून येत आहेत. मात्र तणनाशक फवारणीसाठी काही ठिकाणी आवश्यक तेवढ्याप्रमाणात जमीनीत ओलावा नसल्याने या तणनाशकाचा सुद्धा पाहिजे तसा फायदा होताना दिसून येत नाही. कुठलेही तणनाशक फवारणीकरीता जमिनीमध्ये ओलावा असणे महत्त्वाचे असते, परंतू जिल्ह्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्यात २१९.९ मि.मी. म्हणजे ३२.९३ टक्केच पाऊस आतापर्यंत झाला आहे. त्यातही देऊळगाव राजा, लोणार तालुक्यात १७ व २२ टक्क्यापर्यंतच पाऊस झाला आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे. त्यामुळे तणनाशक फवारणी शेतकºयांसाठी आर्थिक भूर्दंड ठरत आहे. परिणामी, काही ठिकाणी शेतकºयांनी पारंपारीक पद्धतीने डवरणपाळी करण्याला सुरूवात केली आहे.
जिल्ह्यात फवारणीचा ट्रेंड बदलला
पूर्वी पाठीवरच्या पेट्रोल पंपाद्वारे फवारणी केल्या जात होती, मात्र आता जिल्ह्यात फवारणीचा ट्रेंड काहीसा बदललेला दिसून येतो. पाठीवरच्या पंपाची जागा ट्रॅक्टरच्या फवारणी पंपाने घेतली आहे. या ट्रॅक्टरला मागच्या बाजूला एक ५०० लिटरची टाकी आहे. त्या टाकीच्या ठिकाणाहून जवळपास १ हजार मीटर नळीद्वारे फवारा जातो. फवारणीच्यावेळी ट्रॅक्टर शेताच्या बांधावर उभे करून संपुर्ण शेताची फवारणी नळीद्वारे केली जाते. फवारणीची नळी पकडण्यासाठी चार ते पाच मजूर लागतात. एका टाकीच्या फवारणीसाठी शेतकऱ्यांना ८०० ते १ हजार रुपये मोजावे लागत आहेत.
पिकांमध्ये तणाचे प्रमाण वाढल्याने शेतकरी तणनाशकाची फवारणी करत आहेत. मात्र शेतामध्ये आवश्यक त्या प्रमाणात ओलावा असेल, तरच तणनाशकाची फवारणी करावी. तणनाशक फवारणीपूर्वी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या शिफारशीनुसारच फवारणी करावी.
- डॉ.सी.पी. जायभाये,
कृषी शास्त्रज्ञ, बुलडाणा.