१० व्यक्तींवर पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:15 AM2017-07-19T00:15:44+5:302017-07-19T00:15:44+5:30
ग्राम जनुना येथे ‘गुड मॉर्निंग’ पथक सक्रिय
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : येथून जवळच असलेल्या ग्राम जनुना येथे प्रथमच गुड मॉर्निंग पथकाने भेट देऊन १० जणांना उघड्यावर बसू नका, अशी तंबी व समज देऊन १८ जुलै रोजी कारवाई केली.
ग्रामपंचायत जनुना येथे सकाळी ५ वाजता मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकांत पवार, सहायक गटविकास अधिकारी अशोक सानप, विस्तार अधिकारी शरद जाधव, गवई, राजपूत, स्वच्छ भारत मिशनचे दत्ता मगर, घनवटे, जनुना ग्रामसेवक शरद वानखेडे यांनी भेट देऊन उघड्यावर बसणाऱ्या दहा जणांना पकडून त्यांना समज देत शौचालयाचे महत्त्व सांगून सोडून दिले. पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाने तालुक्यात प्रथमच जनुना गावाला भेट देऊन कारवाई सुरू केल्याने कागदोपत्री हगणदरीमुक्त झालेल्या तालुक्यातील गावांनी धसका घेतला आहे. ही पहिलीच वेळ असल्याने नागरिकांना समज देऊन सोडून देण्यात आले. यावेळी गुड मॉर्निंग पथकासोबत पोलीस कर्मचारी देशमुख व पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
जनुना गावातील लोकांना शौचालयाचा वापर करण्याचे मार्गदर्शन केले आहे; परंतु काही लोक उघड्यावर जाताना आढळून आले. त्यामुळे त्यांना समज देऊन सोडून दिले. पुन्हा आढळल्यास ग्रामपंचायतच्यावतीने फौजदारी कारवाई करणार आहे.
-शरद वानखेडे, ग्रामसेवक, जनुना.