बैठे पथक पोहोचलेच नाही!
By Admin | Published: March 10, 2017 01:31 AM2017-03-10T01:31:04+5:302017-03-10T01:31:04+5:30
ग्रामीण परीक्षा केंद्रांकडे विशेष लक्ष; मोबाइलबंदीला विद्यार्थ्यांंसह शिक्षकांचाही प्रतिसाद.
बुलडाणा, दि. ९- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणार्या दहावीच्या परीक्षेला ७ मार्चपासून सुरुवात झाली आहे. ९ मार्च रोजी हिंदीचा पेपर घेण्यात आला. मात्र, शहरातील बर्याच परीक्षा केंद्रांवर बैठे पथक वेळेपर्यंंत उपस्थित झालेच नाही. ही बाब लोकमत चमूने आज शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आली.
जिल्ह्यातील १५0 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा सुरू आहे. कॉपीमुक्त वातावरण तयार करणे व केंद्रावर अनुचित प्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाने या परीक्षा केंद्रावर १५0 बैठे पथकांची नियुक्ती केली आहे. आज हिंदीचा पेपर सुरू होण्याआधी लोकमत चमूने शहरातील बर्याच परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तेव्हा केंद्रावर बैठे पथक उपस्थित नव्हते. पेपर सुरू झाल्यानंतरही केंद्रांवर पथक पोहोचलेच नव्हते. याबाबत केंद्रप्रमुखांना विचारणा केली असता, पहिल्या दिवसापासून बैठे पथक केंद्रावर उपस्थित नव्हते. याबाबत वरिष्ठाकडे पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय केंद्रावर महिला व पुरुष पोलीस कर्मचारी नियुक्त असणे आवश्यक असताना बर्याच केंद्रावर केवळ एकाच पोलीस कर्मचार्याची नियुक्ती होती. मात्र, पोलीस पथकाची गस्त नियमित सुरू होती. शिवाय वर्गखोलीत सुरक्षेची सर्व नियम पाळण्यात आले होते. केंद्रप्रमुखांच्या मार्गदर्शनात परीक्षा बोर्डाच्या नियमानुसार सर्व शिक्षक व कर्मचार्यांचे मोबाइल परीक्षा काळात कार्यालयात जमा करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांंच्या बॅगाही बाहेरच होत्या.
धाड येथे शिक्षकांचे मोबाइल केले जमा
सध्या दहावीची बोर्डाची परीक्षा सुरु असून, सर्वत्र कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. परीक्षा केंद्रावर कार्यरत परीक्षा नियंत्रकाने वा वर्गावर कार्यरत शिक्षकांनी मोबाइल सोबत ठेवण्यास परीक्षा बोर्डाने मनाई केली आहे, असे निर्देश असताना काही परीक्षा केंद्रावर शिक्षकांकडे मोबाईल आढळले म्हणून ९ मार्च रोजी स्थानिक जि.प. हायस्कूल या शाळेत लोकमतच्यावतीने स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. मात्र, या ठिकाणी परीक्षा सुरु होण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे मोबाइल केंद्रप्रमुखाने जमा करुन एका बरणीत बंद केले होते. वर्ग शिक्षकाजवळ मोबाइल आढळला नाही. एकूण बोर्डाच्या सूचनांची व आदेशाची या ठिकाणी अंमलबजावणी होताना आढळली.