१८ सप्टेंबरपासून श्री खामगाव महोत्सव; विविध सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मेजवानी
By अनिल गवई | Published: September 5, 2023 04:04 PM2023-09-05T16:04:14+5:302023-09-05T16:06:15+5:30
पहिल्यादांच आयोजन.
लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: स्थानिक कलावंतांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासोबतच , शहरातील आबालवृध्दांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याच्या उद्देशाने यावर्षीपासून खामगावात श्री खामगाव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. येत्या १८ सप्टेंबरपासून या महोत्सवाला प्रारंभ होणार असून २६ सप्टेंबरपर्यंत विविध प्रबोधनात्मक तसेच मनोरंजनात्मक रंगारंग कार्यक्रम या महोत्सवात पार पडतील. सामाजिक सलोखा जोपासण्याच्या दृष्टीकोनातून हा महोत्सव अनोखा असाच राहील, अशी ग्वाही श्री खामगाव महोत्सव समितीचे अध्यक्ष रामदादा मोहीते यांनी येथे दिली.
श्री खामगाव महोत्सवाच्या रूपरेषेबाबत विस्तृत माहिती देण्यासाठी आयोजित पत्र परिषदेत ते स्थानिक विश्राम गृहात बोलत होते. या उत्सवात १८ सप्टेंबर रोजी प्रसिध्द प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे प्रवचन, १९ रोजी गणेश स्थापना, २० सप्टेंबर रोजी खामगावातील कलावंताचा आर्केस्टा, २१ सप्टेंबर रोजी संजय मालपाणी यांचे श्रीमद् भगवत गीतेवरील निरूपण, अथर्व शीर्ष, तर २३ सप्टेंबर रोजी गौरी अशोक थोरात यांचा मॉ जिजाऊ यांच्यावरील एकपात्री प्रयोग, २४ रोजी शिवराज्याभीषेक सोहळा आदी कार्यक्रम महोत्सवात सादर होतील.
शिवकालीन शस्त्राचे सादरीकरणही सातारा येथील कलावंत करणार आहेत. महसूल योजनाबाबत सामान्यांना तसेच कृषी योजनांबाबत शेतकर्यांना या महोत्सवात मार्गदर्शन केले जाईल. या पत्रकार परिषदेला समितीचे उपाध्यक्ष सागर पॐुंडकर, मार्गदर्शक ओंकारआप्पा तोडकर, कोषाध्यक्ष चंद्रेश मेहता, देवेश भगत, डॉ. बावस्कर, संयोजक ॲड. अमोल अंधारे, सचिव विवेक मोहता, अनिस जमादार, मार्गदर्शक मुक्तेश्वर कुळकर्णी आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक ॲड. अमोल अंधारे यांनी केले. आभार विवेक मोहता यांनी मानले.
सामाजिक सलोखा जोपासण्याचा प्रयत्न
श्री खामगाव महोत्सव समितीची कार्यकारिणी गठीत करताना सर्व धर्म समभावाची जोपासना करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये सर्व जाती धर्माच्या तसेच सर्वच स्तरातील मान्यवरांना समाविष्ट करण्यात आले आहे. महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून बुधवारी मंडप पूजन केले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.