मोठा अनर्थ टळला! राजूर घाटात एसटी बसला अपघात, चार जण किरकोळ जखमी
By निलेश जोशी | Published: October 9, 2023 10:54 PM2023-10-09T22:54:20+5:302023-10-09T22:54:55+5:30
घाटात हनुमान मंदिराजवळ बसचे ब्रेक निकामी झाले
नीलेश जोशी, बुलढाणा: शहरा लगतच्या राजूर घाटात मलकापूरला जाणाऱ्या एसटीबस अपघात होऊन चार जण किरकोळ जखमी झाले. बस चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे माेठी दुर्घटना टळली. अन्यथा ही बस थेट दरीत कोसळली असती. हा अपघात रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडला.बुलढाणा आगारातून एमएच ४०-एन-८१७१ क्रमांकाची बस ही मलकापूरसाठी सायंकाळी निघाली होती.
दरम्यान साडेपाच किमीच्या राजूर घाटात हनुमान मंदिराजवळ बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. नेमक्या वळणवरच हा प्रकार घडला. थोडी जरी चूक झाली असती तर बस काही क्षणात दरीमध्ये कोसळली असती. परंतू चालकाने प्रसंगावधान राखत ही बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेत पाण्याचा निचरा होण्यासाठी खोदलेल्या नालीत घुसवली. गाडीचा वेग पहाता ही गाडी डोंगराला धडकून नालीमध्येच अडकली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान या अपघातामध्ये जिजाबाई सिद्धार्थ नरवाडे (रा. घुस्सर, ता. मोताळा) ही महिला जखमी झाली असून तिच्यासह अन्य तिघे जखमी झाले आहे. त्यांची माहिती मिळू शकली नाही. एसटी महामंडळातर्फे जखमी जिजाबाई नरवाडे यांना ५०० रुपयांची तातडीची आर्थिक मदत करण्यात आली आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी गेलेल्या तपासणी पथकातील एकाच्या म्हणण्यानुसार वाहन चालकाची यात चुकू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघातासंदर्भात प्रत्यक्षात तपासात काय निष्पन्न होते याकडे लक्ष लागून आहे.