मर्दडीच्या घाटात पहाटेच्या सुमारास एसटी बस उलटली; ४ गंभीर, ९ जखमी
By निलेश जोशी | Published: October 6, 2023 09:51 AM2023-10-06T09:51:52+5:302023-10-06T09:52:56+5:30
पहाटेची घटना: जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू
नीलेश जोशी
बुलढाणा: मलकापूरवरून आगाराची एसटीबसला बुलढाणा शहरापासून २० किमी अंतरावर मर्दडीच्या घाटात एका वळणावर अपघातग्रस्त होऊन दरीत कोसळी. सुदैवाने झाडामध्ये ती अडकल्याने मोठा अनर्थ टळला. बसमधील १३ पैकी ४ प्रवाशी गंभीर जखमी असून ९ जण किरकोळ जखमी झाल आहेत. हा अपघात ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला.मलकापूर आगारीच एमएच ४०-वाय-५४८१ क्रमांकाची बस ही मलकापूरवरून छत्रपती संभाजीनगरला जात होती. पहाटे ५:५० वाजता बुलढाणा बसस्थानकातून ही बस धाडच्या दिशेने निघाली होती.
दरम्यान बुलढाणा शहरापासून २४ किमी अंतरावर असलेल्या मर्दडीच्या घाटातील मुख्य वळणावर ही बस न वळता थेट दरीत घुसल्याची माहिती आहे. या दरम्यान बसने एक पलटी घेतली. मात्र घाटातील सागाच्या झाडांमध्ये अडकल्याने अपघाताची तिव्रता कमी झाली. सोबतच एका झाडाला ही बस धडकून तेथेच अडकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दुसरीकडे अपघाताच्या पाच मिनीट अगोदरच एसटीच्या तपासणी पथकाने दुधा गावानजीक बसची तपासणी केली होती. हे तपासणी पथकाचे वाहन व एसटीबस पाठोपाठ जात असतांनाच मर्दडीच्या घाटात हा अपघात घडला.
बसचा काच फोटून प्रवाशांना काढले बाहेर
अपघातानंतर तपासणी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी व स्थानिकांनी तेथे पोहोचत बसचा समोरील काच फोडून जखमींना बाहेर काढले. या अपघातमुळे बसमधील प्रवाशी चांगलेच भेदरले होते. दैव बलवत्तर म्हणून थोड्यात निभावले अशीच प्रतिक्रिया बसमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसत होती. जखमीमध्ये बसच्या चालक व वाहकाचाही समावेश आहे.
जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार
अपघातातील जखमींना प्रथमत: धाड व तेथून बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सकाळी दहा वाजेच्या सुमारास विभाग नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे व त्यांचे सहकारी हे जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी पोहोचले होते.