बस स्थानकात येणाऱ्या १० पैकी ७ एसटींना ठोकले वरून टप्पर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 12:08 PM2021-07-01T12:08:54+5:302021-07-01T12:09:24+5:30
Khamgaon News : खामगाव आगारातील ६७ पैकी बहुतांश बसेसना वरून टप्पर ठोकण्यात आले आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोना विषाणू संसर्गाचा फटका बसल्याने एसटीचे उत्पन्न घटलेय. त्यामुळे कार्यरत असलेल्या बसेसची डागडुजी करण्याची वेळ राज्य परिवहन महामंडळावर आली असून खामगाव आगारातील ६७ पैकी बहुतांश बसेसना वरून टप्पर ठोकण्यात आले आहे.
कोरोना विषाणू संसर्गामुळे गत दीड वर्षापासून आर्थिक मंदीचे संकट गडद होत आहे. अशातच राज्य परिवहन महामंडळाच्या लाल परीची चाकं रुतल्याने एसटीचे उत्पन्न घटले आहे. अशा परिस्थितीत महामंडळाचा गाडा हाकताना राज्य परिवहन मंडळाच्या नाकी नऊ येत आहेत. बसेसच्या डागडुजीवर माेठा खर्च हाेत आहे.
एका तासात बसस्थानकात आल्या २९ गाड्या!
बुधवार ३० जून रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत तब्बल २९ बसेस खामगाव बसस्थानकात दाखल झाल्या. यामध्ये २९ पैकी तब्बल २० बसेसना वरून टप्पर ठोकलेले बुधवारी बस स्थानकावर आढळले.
या आगारातून आल्या बसेस...
अकोला, अमरावती, वाशिम, भुसावळ, जळगाव खांदेश, औरंगाबाद, जालना यांसह शेगाव, जळगाव जामोद, मलकापूर या आगारातील बसेस बसस्थानकात धडकल्या होत्या.