रक्षाबंधनासाठी एसटीच्या जादा बसेस; भाऊ- बहिणींना सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:27 PM2018-08-24T12:27:01+5:302018-08-24T12:29:57+5:30
खामगाव: बहिणींना ‘रक्षाबंधना’ची भेट म्हणून राज्य परिवहन मंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सातही आगारातून दैनंदिन किलोमीटरच्या दहाटक्के जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले.
- अनिल गवई
खामगाव: बहिणींना ‘रक्षाबंधना’ची भेट म्हणून राज्य परिवहन मंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सातही आगारातून दैनंदिन किलोमीटरच्या दहाटक्के जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. यामध्ये लांब पल्ल्याच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते. त्याचप्रमाणे अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील ९ आगारांकडूनही जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आल्याचे समजते.
'रक्षाबंधन'निमित्त एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आगार निहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद, मेहकर आणि चिखली या सातही आगारासोबतच देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, नांदुरा, मोताळा आणि लोणार या वाहतूक नियत्रंण केंद्रावरूनही जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये रविवारी दैनंदिन वाहतुकीच्या तुलनेत दहा टक्के जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांना यामध्ये प्राधान्य दिल्या जाणार असून त्या दृष्टीकोनातून प्रत्येक आगारातून अतिरिक्त वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
परतीच्या प्रवासासाठीही सुविधा!
२५, २६ आणि २७ आॅगस्टरोजी एसटी महामंडळाकडून जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये २६ आॅगस्ट रोजी दैनंदिन किलोमीटरच्या दहा टक्के जादा नियोजन करण्यात आले आहे. तर परतीच्या प्रवासासाठी २७ आॅगस्ट रोजी देखील भाऊ-बहिणींना अतिरिक्त सुविधा देण्याचा एसटी महामंडळाचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे दिसून येते.
एसटी कर्मचाऱ्यांच्या रजा बंद!
रक्षाबंधनानिमित्त प्रवाशांना अतिरिक्त सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळातील चालक-वाहकांसोबतच कार्यालयीन कर्मचाºयांच्या रजा यापार्श्वभूमीवर बंद करण्यात आल्याची माहिती आहे. रक्षाबंधन सणाच्या कालावधीत सर्व एसटी कर्मचारी रजा न घेता अहोरात्र काम करुन प्रवाशांना सुरक्षित व वक्तशिर सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे समजते.