एसटी महामंडळाचे मालवाहतूक, गोदामाचे स्वप्न झाले धुसर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 03:28 PM2020-01-04T15:28:13+5:302020-01-04T15:28:31+5:30
प्रवासी वाहतूकीबरोबर मालवाहतूक करणे व गोदामांच्या व्यवसायात उतरण्या संदर्भात विभागस्तरावर कुठल्याच सुचना आतापर्यंत प्राप्त झालेल्या नाहीत
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांकरीता मालवाहतूक आणि गोदामाची व्यवस्था करण्याची घोषणा माजी परिवहन मंत्र्यांनी केली होती. या घोषणेची ३ जानेवारीला वर्षपुर्ती होत असतानाही राज्यात विभाग नियंत्रक स्तरावर अंमलबजावणीच्या हालचाली झाल्या नाहीत. घोषणेचा महामंडळालाच विसर पडल्याने एसटीचे मालवाहतूक आणि गोदामाचे स्वप्न धुसर होत आहे.
राज्य परिवहन महामंडळ उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने नवनवीन बसेस व विविध उपाययोजना करताना दिसून येत आहे. दरम्यान, एसटीचे उत्पन्न वाढविण्यासोबत शेतकऱ्यांना शेतमाल साठवण्यासाठी किफायतशीर दरात सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मालवाहतूक सेवा सुरू करण्याची घोषणा गतवर्षी करण्यात आली होती. तसेच महामंडळाकडून गोदामांचा व्यवसायही सुरू करण्यात येणार होता. महामंडळाने प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतूक करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे. आतापर्यंत दुर्लक्षीत असलेल्या मालवाहतुकीच्या तरतुदीचा आता वापर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला होता. त्यासाठी स्वतंत्र वाहनांद्वारे मालवाहतूक करणे व विनावापर पडून असलेल्या जागांवर ३०१ गोदामांची निर्मिती करण्यात येणार होती. रेल्वे मालवाहतुकीच्या धर्तीवर एसटीचीही मालवाहतूक सुरु करण्याचे हे धोरण होते. वापरातील प्रवासी वाहनांचे नऊ वषार्नंतर सर्व तांत्रिक बाबी पडताळून मालवाहतूक वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येईल. त्यास परिवहन विभागाची रीतसर मान्यता घेण्यात येईल. त्यानंतर ही वाहने मालवाहतुकीसाठी वापरण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आलेले असतानाही त्याची अंमलबजावणी मात्र झालेली नाही. कृषी माल, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, व्यापारी माल, स्टेशनरी आदी सर्व प्रकारच्या मान्यताप्राप्त मालाची वाहतूक या माध्यमातून केली जाणार होती. परंतू याबाबतच्या निर्णयाला वर्ष पुर्ण होत आलेले असतनाही त्याच्या अंमलबजावणी शुन्य आहे.
विभागस्तरावर सुचनाच नाहीत!
प्रवासी वाहतूकीबरोबर मालवाहतूक करणे व गोदामांच्या व्यवसायात उतरण्या संदर्भात विभागस्तरावर कुठल्याच सुचना आतापर्यंत प्राप्त झालेल्या नाहीत. याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार कंपनीने त्यांचा अहवाल सादरीकरण केला होता. या निर्णयाला वर्ष होत आलेले आहे; परंतू याबाबतचे पत्र विभागास्तरावर महामंडळाकडून आलेले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.
नव्या मंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
माजी परिवहन मंत्र्यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करायची की, त्यावर वेगळा निर्णय घ्यायचा हे नव्या परिवहन मंत्र्यावर अवलंबून आहे. त्यामुळे एसटीच्या मालवाहतूक व गोदामाच्या घोषणेवर नवी मंत्री काय निर्णय घेतात याकडे एसटी महामंडळातील अधिकाºयांचेही लक्ष लागूण आहे.