एसटी चालक-वाहकांची रात्र डासांसोबत बसमध्येच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:02 AM2021-03-13T05:02:50+5:302021-03-13T05:02:50+5:30
ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सात आगारांच्या २५ बसगाड्या ग्रामीण भागांत मुक्कामी जात आहेत. कोरोना काळात तीन ते चार ...
ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सात आगारांच्या २५ बसगाड्या ग्रामीण भागांत मुक्कामी जात आहेत. कोरोना काळात तीन ते चार महिने मुक्कामी बसगाड्या बंद होत्या. मात्र, बससेवा सुरू झाल्यानंतर पुन्हा मुक्कामी बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होऊ लागली होती. ही बाब लक्षात घेऊन व प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून जिल्ह्यातील सर्व आगारांतून बसेस सोडण्यात येतात. ज्या गावांमध्ये बस मुक्कामी असतात, यापैकी बहुतांश ठिकाणी वाहक-चालकांच्या निवासाची व्यवस्था नसल्याने त्यांना कधी मंदिरात, तर कधी एसटीतच रात्र काढावी लागते. यामुळे डासांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
वाहक-चालकांना बसतोय फटका
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, तरीदेखील आवश्यक ती खबरदारी घेऊन एसटी बसने प्रवासी वाहतूक सुरू आहे. काही अपवाद वगळता वाहतूक सुरळीत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाची भीती कायम आहे. अशा स्थितीत वाहक-चालकांना त्याचा फटका बसत आहे.
काही ठिकाणी ग्रामपंचायतीकडून सोय
मुक्कामाच्या काही ठिकाणी वाहक-चालकांना निवासाची सोय ग्रामपंचायतीने केली आहे. त्यामुळे कोरोना काळातही एसटीची सेवा सुरळीतपणे सुरू आहे. शिवाय, ग्रामस्थांकडून चांगली वागणूक मिळत असल्याचे वाहक-चालकांनी सांगितले. काही ठिकाणी मात्र याउलट परिस्थिती असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
बऱ्याच गावांत सार्वजनिक शौचालयही नाही
ग्रामीण भागातील गावांमध्ये सार्वजनिक शौचालयाची सोय नसल्याने चालक-वाहकांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे ज्या गावात मुक्कामी बसेस आहेत, त्या गावात तरी सार्वजनिक शौचालयांची सोय असणे गरजेचे असल्याचे मत वाहक-चालकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
कोरोना संसर्गाची भीती
चालक-वाहकांचा दररोज शेकडो प्रवाशांशी संपर्क येतो. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाची भीती आहे. प्रवाशांना वारंवार सांगूनही त्यांच्याकडून मास्क वापराकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. स्वत:सह इतरांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांनीच शासनाच्या मार्गर्शक सूचनांचे पालन करण्यात गरज असल्याचे मत चालक वाहकांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील सहा आगरांमधून एकूण २५ बसेस ग्रामीण भागात मुक्कामासाठी जातात. काही ठिकाणी ठिकाणी चालक व वाहकांच्या मुक्कामाची व्यवस्था नाही. त्यांना बसगाड्यांमध्येच मुक्काम करावा लागतो. तालुका तथा जिल्हा स्तरावर मुक्कामासाठी एसटीचे रेस्ट हाउस आहेत. ग्रामपंचायत स्तरावर व्यवस्था करणे आवश्यक आहे.
- ए. यू. कच्छवे, विभागीय वाहतूक अधिकारी, बुलडाणा.
आगारनिहाय मुक्कामी जाणाऱ्या बसेस
बुलडाणा जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे बुलडाणा, चिखली, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद व शेगाव असे एकूण सात आगार आहेत. त्यापैकी सहा आगारांमधून एकूण २५ बसेस ह्या मुक्कामासाठी जातात. त्यामध्ये बुलडाणा आगारातून नऊ, खामगाव दोन, मेहकर सहा, मलकापूर एक, जळगाव जामोद सहा, शेगाव एक बस मुक्कामासाठी जाते.