त्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांच्या विम्याचा लाभ द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:15+5:302021-07-18T04:25:15+5:30
चिखली : कोरोनामुळे निधन पावलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांच्या विम्याचा लाभ देण्याची मागणी आमदार श्वेता महाले यांनी परिवहन ...
चिखली : कोरोनामुळे निधन पावलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांच्या विम्याचा लाभ देण्याची मागणी आमदार श्वेता महाले यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
या अनुषंगाने दिलेल्या पत्रात आमदार महाले यांनी म्हटले आहे की, राज्यभरामध्ये कोरोना महामारीच्या काळात शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना घरीच राहावे लागले. त्यामुळे त्यांचा रोजगार बुडाला. त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. परंतु शासनाने त्यांना ऐन संकटाच्या काळात आर्थिक मदतीचा हात दिला नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेतील कोरोना महामारी कमी झाल्यामुळे शासनाने राज्यभरात बससेवा सुरू केल्या. कोरोना महामारीच्या काळात जिवावर उदार होऊन एस. टी. कर्मचाऱ्यांनी या काळात आपले कर्तव्य निभावले. राज्य शासनाने एस. टी. कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा काढलेला असतानाही अद्यापपर्यंत काेराेनाने मृत्यू झालेल्या एकाही कुटुंबाला विम्याचा लाभ मिळालेला नाही. कुटुंबीयांचा आधार गेलेला असतानाही राज्य शासनाकडून त्यांच्या हक्काच्या विम्याचा लाभही मिळालेला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या कोरोनामुळे निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना विम्याचा व इतर लाभ देऊन आधार द्यावा, अशी मागणी आमदार श्वेता महाले यांनी या पत्राद्वारे केली आहे.
३०१ कर्मचाऱ्यांचा काेराेनाने मृत्यू
राज्यभरात ३०१ इतक्या एस.टी. कर्मचाऱ्यांचे निधन झाले. कोरोनामुळे आजपर्यंत राज्यातील आठ हजार ८९० एस.टी. कर्मचारी बाधित होऊन ८३९० कर्मचारी बरे झाले आहे. आजरोजी राज्यभरात २७०० एस.टी.कर्मचारी पॉझिटिव्ह असून ८५० कर्मचारी दवाखान्यात, तर उर्वरित गृह विलगीकरणात आहे.