बुलडाणा जिल्ह्यात एसटीच्या कॅशलेस प्रवासाच्या दिशेने हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 05:27 PM2019-06-03T17:27:09+5:302019-06-03T17:27:25+5:30
बुलडाणा: एसटीचा प्रवास कॅशलेस पद्धतीने करण्याची घोषणा १ जून रोजी करण्यात आली असून, त्यानुसार जिल्ह्यात हालचाली सुरू झाल्या आहेत.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: एसटीचा प्रवास कॅशलेस पद्धतीने करण्याची घोषणा १ जून रोजी करण्यात आली असून, त्यानुसार जिल्ह्यात हालचाली सुरू झाल्या आहेत. कॅशलेस प्रवासासाठी प्रवाशांना लागणाºया स्मार्ट कार्डकरीता डेपोनिहाय नोंदणी करण्याचे काम सुरू झाले असून त्यासाठी प्रत्येक ठिकाणी दोन कर्मचाºयांवर काम सोपविण्यात आले आहे. नोंदणी संदर्भात जिल्ह्यातील सर्व बसस्थानकावर सुचना पत्रकही लावण्यात आले आहे. दरम्यान, नोंदणीनंतर साधारणत: आठ दिवसात स्मार्ट कार्ड मिळणार आहे.
‘सुरक्षित प्रवास, एसटीचा प्रवास’ हे ब्रीद घेऊन अविरत धावणाºया राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये दिवसेंदिवस अनेक बदल होत आहेत. एसटी महामंडळाने आधुनिकतेकडे वाटचाल केली असून आता कॅशलेस व्यवहाराकडे एसटीचा प्रवास वळल्याचे दिसून येत आहे. एसटीचा प्रवास कॅशलेस करण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या ७१ व्या वर्धापनदिनी केली. कॅशलेस व्यवहारासाठी अवश्यक असणाºया स्मार्ट कार्ड देण्याच्या अनुषंगाने अंमलबजावणीला एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागात सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात येणाºया बुलडाणा, चिखली, खामगाव, शेगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद या सातही आगारांतर्गत स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील एकूण १३ बसस्थानकावर स्मार्ट कार्डची माहिती व प्रवाशांनी नोंदणी करण्याबाबतच्या सुचना लावण्यात आल्या आहेत. स्मार्ट कार्डच्या नोंदणीसाठी प्रत्येक आगारातील कर्मचाºयांना सुचना देण्यात आल्या आहेत. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने एसटी महामंडळाने सुरू केलेल्या स्मार्ट कार्ड योजनेमुळे अनेक फायदे एसटी महामंडळाला होणार आहेत. तसेच स्मार्ट कार्डमुळे एसटीच्या प्रवासात सुट्ट्या पैशांवरून कंडक्टरशी प्रवाशांचे होणारे वाद टळतील. या योजनेत विशिष्ट रक्कम भरून कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच अन्य व्यक्तींनाही प्रवास करता येणार आहे.
प्रत्येक आगाराला संगणकाचे वितरण
स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांची नोंदणी करण्याकरीता जिल्ह्यातील प्रत्येक आगाराला संगणकाचे वितरण करण्यात आले आहे. तसेच कॅशलेस व्यवहाराच्या या कामाची व नोंदणीची जबाबदारी प्रत्येक ठिकाणी दोन कर्मचाºयांवर सोपाविण्यात आली आहे.
स्मार्ट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
कॅशलेस व्यवहाराच्या स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांना आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्ड यापैकी कुठलेही एक कागदपत्र आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी शाळेचे बोनाफाईड व आधार कार्ड आवश्यक आहे. या नोंदणीकरीता मोबाईल सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच अर्जाचे ५ रुपये व स्मार्टकार्डचे ५० रुपये शुल्क आकारल्या जाणार आहे. त्यानंतर सुरूवातीला ३०० रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. त्यानंतर १०० रुपयांच्या पटीत ५ हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येईल. हे रिचार्ज घरुन आॅनलाइन पद्धतीनेही केल्या जाते.
प्रत्यक्ष अंमलबजावणीला लागणार तीन महिने
स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केल्यानंतर आठ ते दहा दिवसात स्मार्ट कार्ड मिळणार असले तरी, प्रत्यक्षात कॅशलेस व्यवहारावर प्रवासाच्या अंमलबजावणीला जवळपास तीन महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तोपर्यंत जेष्ठ नागरिक, विद्यार्थी व इतर प्रवाशांची नोंदणी करण्याचे काम सुरू राहणार आहे.
स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करण्याचे काम प्रत्येक बसस्थानकावर सुरू झाले आहे. सर्व प्रवाशी जेष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांनी स्मार्ट कार्डच्या सुविधेचा लाभ घ्यावा. लवरकच या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल.
- ए. यू. कच्छवे,
विभागीय वाहतूक अधिकारी, बुलडाणा.