एसटी विद्यार्थ्यांना मिळणार नामांकित निवासी शाळेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:30 AM2020-12-24T04:30:00+5:302020-12-24T04:30:00+5:30

बुलडाणा : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी ...

ST students will get admission in a nominated residential school | एसटी विद्यार्थ्यांना मिळणार नामांकित निवासी शाळेत प्रवेश

एसटी विद्यार्थ्यांना मिळणार नामांकित निवासी शाळेत प्रवेश

Next

बुलडाणा : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता १ ली व २ री मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज विनामूल्य प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालय तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२१ आहे, तसेच इयत्ता १ ली व इयत्ता २ री मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी हा अनुसूचित जमाती प्रवर्गाचा असावा, तसेच पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. जर विद्यार्थी दारिद्र्य रेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांक नमूद करण्यात यावा. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा १ लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. तहसीलदाराचे प्रमाणपत्र असावे. इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ६ वर्षे पूर्ण असावे. जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांचे पालक शासकीय / निमशासकीय नोकरदार नसल्याचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकाकडून संमतीपत्र घेण्यात येईल. वर्ग २ साठी शिकत असलेल्या शाळेमधील मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र, आधार कार्डाची झेरॉक्स प्रत (विद्यार्थ्यांची) जोडावी लागणार आहे. अपूर्ण कागदपत्रे असल्यास तसेच खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल, असे ममता विधळे, सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.

Web Title: ST students will get admission in a nominated residential school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.