एस.टी. बस, दुचाकी अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:40 AM2021-09-15T04:40:31+5:302021-09-15T04:40:31+5:30
चिखली : आयटीआयचा पेपर सोडविण्यासाठी खामगाव येथे दुचाकीने गेलेल्या चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे आणि बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील दोन ...
चिखली : आयटीआयचा पेपर सोडविण्यासाठी खामगाव येथे दुचाकीने गेलेल्या चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे आणि बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील दोन विद्यार्थ्यांचे खामगावजवळील लोखंडा शिवारात धरण फाट्याजवळ अपघातात निधन झाले. खामगावकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने एका वाहनास ओव्हरटेक करताना या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने हा अपघात घडला.
देऊळगाव घुबे येथील ऋषीकेश अरुण साखरे (वय २१) आणि शुभम नारायण काकडे (रा. रायपूर, ता. जि. बुलडाणा) हे दोन विद्यार्थी खामगाव येथील आयटीआय कॉलेजमध्ये १३ सप्टेंबरला आयटीआयचा पेपर सोडवण्यासाठी एमएच-२८-एक्स-८५३३ क्रमांकाच्या दुचाकीने गेले होते. पेपर सोडविल्यानंतर सायंकाळच्या सुमारास दुचाकीने परतत असताना लोखंडा शिवारातील धरण फाट्याजवळ औरंगाबादहून खामगावकडे जाणाऱ्या एसटी बसचा (एमएच-२०-बीएल-१६९७) चालक एकनाथ शिवदास डोंगरे (३५, रा. औरंगाबाद) याने आपल्या ताब्यातील बस भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून खामगावकडे तोंड करून उभ्या असलेल्या व भुसा भरलेल्या एमएच-२८-एच-९८६० क्रमांकाच्या वाहनास धडक देत चालकाच्या बाजूने अेाव्हटेक करीत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीलादेखील जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील ऋषीकेश साखरे व शुभम काकडे या विद्यार्थ्यांचा जबर मार लागला. दरम्यान, विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकेद्वारे डॉ. तकवीर अहमद प्राथमिक आरोग्य रुग्णालय, लाखनवाडा येथे दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, याबाबतचे वृत्त कळताच दोन्ही गावांवर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातातील मृतक ऋषीकेश हा सुस्वभावी, मेहनती, निर्व्यसनी, नम्र असा मुलगा होता. त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.