बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांची उपासमार!
By admin | Published: July 5, 2017 12:17 AM2017-07-05T00:17:49+5:302017-07-05T00:17:49+5:30
मेहकर : येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मैल कामगार कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून पगार रखडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मैल कामगार कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून पगार रखडले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, पगार लवकरात लवकर करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांच्याकडे केली आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत मैल कामगार कर्मचारी काम करतात. हे कर्मचारी तालुक्यातील रस्ता दुरुस्तीचे काम करीत असतात. या कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नुकत्याच शाळा सुरु झाल्या असून, मुलांच्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी या कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत, तसेच घर खर्च व इतर आर्थिक उलाढाल करण्यासही कर्मचाऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून थकीत असलेले पगार तत्काळ करावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष जी.पी.देशमुख तसेच रजनिकांत गवई, सुभाष मोठे, हरिभाऊ काळे, वामन चव्हाण, जाफर शाह नुरशाह, किसन वानखेडे, रामधन पवार, रामभाऊ चव्हाण, प्रकाश भोजणे, दगडू दिवतकर, आश्रु ठोंबरे, नंदकिशोर मापारी, मारोती ठोंबरे, भानुदास जाधव, दत्ता घुगे, रंगा राठोड आदींनी केली आहे.