आराेग्य उपकेंद्रामधील कर्मचाऱ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:35 AM2021-09-19T04:35:33+5:302021-09-19T04:35:33+5:30
किनगाव जट्टू : बीबी, किनगाव जट्टू परिसरातील प्रा. आरोग्य उपकेंद्रांमध्ये काही कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याने ग्रामीण भागातील ...
किनगाव जट्टू : बीबी, किनगाव जट्टू परिसरातील प्रा. आरोग्य उपकेंद्रांमध्ये काही कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे़ त्यामुळे, या परिसरातील प्राथमिक आराेग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना नियमित उपस्थित राहण्याचे आदेश देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केली आहे.
गत काही दिवसांपासून किनगाव जट्टू, बीबी परिसरामध्ये वारंवार होणाऱ्या वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांना सर्दी, ताप, खोकला अशा विविध आजाराने डोके वर काढले आहे. शेतकरी, शेतमजूर यांच्यासह गोरगरीब जनतेला खासगी रुग्णालयात जाऊन महागडी औषधी घेऊन उपचार करावा लागत आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी ग्रामीण भागातील गावात फिरकतसुद्धा नसल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
तांबाेळा उपकेंद्राची इमारत ठरली शाेभेची वास्तू
काही दिवसांपूर्वी तांबोळा येथे आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधलेली असून, जवळपास एक वर्ष उलटले तरी अद्यापही उपकेंद्र नागरिकांच्या सेवेत सुरू झाले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना खासगी दवाखान्यात महागडा उपचार घ्यावा लागतो. या संदर्भात तत्कालीन लोणार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उपकेंद्र हे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून आरोग्य विभागाकडे देण्यात आले नसल्याचे सांगितले हाेते. हे उपकेंद्र सुरू करण्याची गरज आहे.
स्वाभिमानी संघटनेचा आंदाेलनाचा इशारा
मागण्यांची दखल न घेतल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड, लोणार तालुका अध्यक्ष अनिल मोरे, युवा तालुका अध्यक्ष संजय चाटे, तालुुका उपाध्यक्ष अनिल लांडगे, भागवत मुर्तडकर, विकास मुळे, आदींची स्वाक्षरी आहे.