४१ व्या राज्य अजिंक्यपद हॅन्डबॉल स्पर्धेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 05:21 PM2018-11-14T17:21:29+5:302018-11-14T17:22:00+5:30
बुलडाणा: ४१ व्या राज्य अजिंक्यपद हॅन्डबॉल स्पर्धेस बुलडाणा येथील जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रारंभ झाला.
बुलडाणा: ४१ व्या राज्य अजिंक्यपद हॅन्डबॉल स्पर्धेस बुलडाणा येथील जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रारंभ झाला. दरम्यान, राज्यातील २६ जिल्हयातील ४०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. १९ वर्षाखालील मुलांच्या या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे अधिकारी डॉ. अशोक खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, गजाननराव फुंडकर, गितेशचंद्र साबळे, सीताराम भोतमांगे, राजेंद्र राऊत, पंडीतराव देशमुख, जितेंद्र जैन, नारायणराव सुसर, श्रीकृ्ष्ण जेऊघाले, हरिदास पाटील, श्रीकृष्ण शेटे, जितेंद्र अक्कर, हनुमंतराव लुंगे, बाबासाहेब भोंडे प्रामुख्याने उपस्थित होते. स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ म्हणाले की, खेळाडूंनी खेळाच्या माध्यमातून देशाचा सन्मान वाढवावा आणि ध्येयाचा पाठलाग करावा. यश हे तुमचेच आहे. खेळ खेळतांना तो निकोप भावनेने खेळावा. खेळात हार-जीत होत असते. हारणार्यांनी अधिक सरावर करून आपली क्षमता सिद्ध करावी, असे आवाहन उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या २६ जिल्ह्यातील खेळाडूंना केले. दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील म्हणाले की, शासन, प्रशासन आणि असोसिएशन यांच्यातील समन्वयाने क्रीडाक्षेत्राचा निश्चित विकास होईल. त्यादृष्टीने क्रीडा कार्यालयाचे सातत्याने सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित गुणवंत खेळाडू व क्रीडा शिक्षकांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये देवेंद्र चौगुले, एकनाथ साळुंखे, रुपेश मोरे, सुभाष गावंडे, फिलीप थॉमस, सागर नारखेडे, उदय पवार, राजेश गारडे, प्रफुल्ल खर्चे, श्रीपाद मालप, दीपक बोर्डे, विजय पळसकर, आकाश सुरडकर, अक्षया सुरोशे, उज्वला लांडगे, नितीन बोरले यांचा समावेश होता. पोलिस दलातीलही खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला. दरम्यान, ही स्पर्धा साखळी व बाद फेरीमध्ये खेळविण्यात येत असून १४ नोव्हेंबरला बहुतांश साखळी सामने झाले. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी बाद फेरीतील सामने होऊन स्पर्धेच्या विजेतेपदासाठी प्रामुख्याने संघ एकमेकाविरोधात भिडतील.
बुधवारी विजयी झालेले संघ
बुधवारी उस्मानाबाद विरुदध नागपूर यांच्यात पहिला सामना झाला. त्यात ३४ विरुद्ध चार गोल फरकाने नागपूर संघ विजयी झाला. परभणी विरुद्ध वाशिम संघामध्येही एकतर्फी सामना होऊन परभणी संघाने वाशिम संघाचा १६ विरुद्ध पाच अशा गोलफरकाने पराभव केला. अहमदनगरने चंद्रपूर जिल्ह्याचा १४ विरुद्ध ०६ अशा गोल फरकाने पराभव केला. पुण्याने अकोला संघाला एकतर्फी सामन्यात ३० विरुद्ध चार अशा फरकाने मात दिली. बुलडाणा विरुद्ध औरंगाबाद संघात अत्यंत चुरशीचा सामना होऊन त्यात बुलडाणा संघाने २४ विरुद्ध चार अशा गोल फरकाने बाजी मारली. बुलडाण्याचा तेजस घाटे ५, प्रणव काठोके-५, कृष्णा जयसवाल-६, मनोज ठोंबरे ८ गोल करून चमकले. औरंगाबाद संघाकडून नवनाथ राठोड ८, सुलेमान शेखने सहा गोल केले. लातूरने ठाण्याचा पराभव केला तर नागपूरच्या क्रीडा प्रबोधीनी संघाने नाशिकचा एकतर्फी सामन्यात ३५ विरुद्ध ११ अशा गोल फरकाने पराभव केला.