नाफेडअंतर्गत हायब्रीड ज्वारीची खरेदी सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:07+5:302021-07-10T04:24:07+5:30
नाफेडअंतर्गत हायब्रीड ज्वारी खरेदी करण्याकरिता ऑनलाइन अर्ज करण्याचे शासनाच्या वतीने आवाहन केले होते़ त्यानुसार ज्या शेतकऱ्याकडे हायब्रीड ज्वारी ...
नाफेडअंतर्गत हायब्रीड ज्वारी खरेदी करण्याकरिता ऑनलाइन अर्ज करण्याचे शासनाच्या वतीने आवाहन केले होते़ त्यानुसार ज्या शेतकऱ्याकडे हायब्रीड ज्वारी आहे, त्यांनी ऑनलाइन अर्ज केले़ लोणार येथे काही शेतकऱ्यांची खरेदीसुद्धा करण्यात आली; परंतु आता नाफेड खरेदी केंद्र बंद केले असून बऱ्याच शेतकऱ्यांकडे हायब्रीड ज्वारी पडून आहे़ ऑनलाइन अर्ज केल्यामुळे खुल्या बाजारातसुद्धा विक्री केली नाही़ नाफेड केंद्रावर शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी बंद करण्यात आली आहे़ त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीचा सामना करीत आहेत़ सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना रासायनिक खते, बियाणे, औषधे आणण्यासाठी भरपूर पैशांची गरज आहे़ त्यामुळे नाफेडच्या खरेदी केंद्राअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेल्या आहे व खरेदी बाकी असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे हायब्रीड ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून खरेदी करण्याची मागणी निवेदनात केली आहे़ मागणी मान्य न झाल्यास १२ जुलैपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लोणार तहसील कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांच्या घरातील हायब्रीड ज्वारीचे पोते आणून गंज घालण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे़ या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्यासह लोणार तालुका अध्यक्ष अनिल मोरे, युवा तालुकाध्यक्ष संजय चाटे आदींची स्वाक्षरी आहे़