नाफेडची हरभरा खरेदी तत्काळ सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:32 AM2021-03-06T04:32:24+5:302021-03-06T04:32:24+5:30
तालुक्यात दरवर्षी खरेदी विक्री संस्थेच्या वतीने नाफेड अंतर्गत शासकीय हमी भावाने हरभरा व इतर कडधान्य खरेदी केले जाते. यावर्षी ...
तालुक्यात दरवर्षी खरेदी विक्री संस्थेच्या वतीने नाफेड अंतर्गत शासकीय हमी भावाने हरभरा व इतर कडधान्य खरेदी केले जाते. यावर्षी अजूनही खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे, तत्काळ खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आली आहे.
शेतातील हरभरा काढून विक्रीसाठी तयार असून जवळपास १,४०० शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संस्थेकडे हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली आहे. मात्र, अद्यापही प्रत्यक्षात हमी भावाने हरभरा खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने हरभरा विकत आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी शासकीय हमी भावाने नाफेड हरभरा खरेदी तत्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
व्यापारी ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल मनमानी भावाने हरभरा खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी हमी भावाने नाफेड अंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदी तत्काळ सुरू करावी अशी मागणी शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, जहीर पठाण, विनायक अनपट, अजमत पठाण, संतोष हिवाळे, अयाज पठाण, चंद्रभान झिने यांच्यासह आदींनी केली आहे.