प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:29 AM2021-05-03T04:29:21+5:302021-05-03T04:29:21+5:30
चिखली : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून, हा आकडा भविष्यात मोठा होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. त्यातुलनेत ...
चिखली : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून, हा आकडा भविष्यात मोठा होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. त्यातुलनेत जिल्ह्यात उपलब्ध करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी आमदार श्वेता महाले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या अनुषंगाने आमदार श्वेता महाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना १ मे रोजी दिलेल्या पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.
कोणत्याही कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालयात आज रोजी बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत आहे. रुग्णवाढीचा वेग पाहता भविष्यात परिस्थिती भयावह होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून पाहिजे त्याप्रमाणात कोरोना केअर सेंटरची उपलब्धता होण्याच्या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे. आज रोजी उपचारासाठी दवाखान्याच्या पायऱ्यांवर बसून उपचार घ्यावा लागत आहे. याची वेळीच दखल घेत प्रत्येक तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती आहेतच, शिवाय १० किंवा त्यापेक्षा अधिक बेडची व्यवस्था उपलब्ध आहे. त्यातील अर्धे बेड कोविड रुग्णाच्या उपचारासाठी उपलब्ध करून दिल्यास व उर्वरित बेड इतर आजारी असणाऱ्या रुग्णांसाठी ठेवल्यास कोरोना आणि इतर आजाराचासुद्धा उपचार करणे शक्य होणार आहे. तसेच यामुळे गावातील रुग्णांवर गावातीलच आरोग्य केंद्रात उपचारासाठी ठेवल्या गेल्याने तालुका व जिल्हा आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक आरोग्य केंद्रावर उपलब्ध जागेच्या अनुषंगाने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात यावे. तसेच कोविड केअर सेंटरसाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी कर्मचारीवर्ग देण्यात यावा, अशी मागणी आ. महाले यांनी केली आहे.