शांती महोत्सवास उत्साहात प्रारंभ
By admin | Published: October 16, 2016 02:20 AM2016-10-16T02:20:19+5:302016-10-16T02:20:19+5:30
खामगाव शहराला धार्मिक स्वरूप प्राप्त.
खामगाव, दि. १५- शतकाची परंपरा असलेल्या शांती (जगदंबा, मोठी देवी) महोत्सवास खामगाव येथे शनिवारपासून सुरुवात झाली. या उत्सवानिमित्त शहराला धार्मिक स्वरूप प्राप्त होत असून, देशात केवळ खामगावातच हा उत्सव साजरा होत असल्याने, इतर राज्यातील भाविकांचीही येथे दर्शनासाठी मोठय़ासंख्येने गर्दी होते.
शांती महोत्सवाला तब्बल १0८ वर्षांंंचा इतिहास असून, खामगाव शहरात आजही या महोत्सवाचे महत्त्व अबाधित आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मोठी देवी म्हणजेच जगदंबा मातेची स्थापना केली जाते. याच दिवशीपासून जगदंबा नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवसाला पावणारी देवी म्हणूनही मोठी देवीची महती सर्वदूर असून, शांती उत्सवाला मुंबईतील लालबागच्या राजाच्या गणेशोत्सवाप्रमाणेच महत्त्व आहे. दरम्यान, या उत्सवाला शनिवारी सायंकाळी ६ वाजता श्री मोठी देवीच्या प्राणप्रतिष्ठेने सुरुवात झाली. या उत्सवानिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले असून, २२ ऑक्टोबर रोजी मोठी देवी सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने २२ ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २३ ऑक्टोबर रोजी सत्यनारायण पूजा आणि २४ ऑक्टोबर रोजी मोठी देवीची शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी घाटपुरी येथील नदीत देवीच्या विसर्जनाने शांती उत्सवाची सांगता होणार आहे. जलालपुर्यातील मोठी देवीच्या मंडपामागेच मानाच्या लहान देवी सोबतच इतरही जगदंबा देवींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.