बुलडाणा जिल्ह्यात नवनगराच्या कामांना लवकरच प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 02:03 PM2019-01-05T14:03:02+5:302019-01-05T14:05:22+5:30

बुलडाणा: नागपूर-मुंबई या दहा जिल्ह्यातून जाणार्या समृद्धी महामार्गावर मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यात दोन ठिकाणी नवनगर उभारण्यात येणार आहे.

Start of new city work in Buldana district soon | बुलडाणा जिल्ह्यात नवनगराच्या कामांना लवकरच प्रारंभ

बुलडाणा जिल्ह्यात नवनगराच्या कामांना लवकरच प्रारंभ

Next

- नीलेश जोशी 
बुलडाणा: नागपूर-मुंबई या दहा जिल्ह्यातून जाणार्या समृद्धी महामार्गावर मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यात दोन ठिकाणी नवनगर उभारण्यात येणार असून या स्मार्ट सिटीच्या कामास येत्या १५ दिवसात प्रारंभ करण्याचे दोन जानेवारी रोजी झालेल्या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठकीत एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी सुचीत केले आहे.
दोन जानेवारीला समृद्धी महामार्ग जात असलेल्या दहाही जिल्ह्यातील एमएसआरडीसी, समृद्धी महामार्गाचे काम महसूल विभागातील अधिकारी यांची मुंबईतील बांद्रा येथे असलेल्या कार्यालयात सायंकाळी ही महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवारही प्रामुख्याने उपस्थित होते. त्यामध्ये संपूर्ण कामाचा आढावा घेण्यात येऊन भूसंपादनाची रखडलेली उर्वरित प्रकरणे त्वरेने निकाली काढण्यासोबतच नवनगर निर्माणाच्या दृष्टीने १५ दिवसात कामाला प्रारंभ करण्याबाबत सुचित करण्यात आले. या बैठकीस दहा ही जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे काम करणारे १३ ही कंत्राटदार उपस्थित होते.
बुलडाणा जिल्ह्यात दोन नवनगर प्रस्तावीत असून त्यातील एक नवनगर हे मेहकर तालुक्यातील साब्रा, काब्रा, फैजलपूर परिसरात आणि दुसरे सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ, निमखेड, गोळेगाव येथे होणार आहे. या नवनगरासाठी प्रती नवनगर जवळपास ५०० हेक्टर जमिनीची गरज पडणार आहे. त्यानुषंगाने या भागातील जागेचे मॅपींग, सातबारा तपासणे, शेतकर्यांचे संमतीपत्र घेणे ही कामे करण्यात येऊन संपूर्ण नगराच्या सीमाक्षेत्राची आखणी करण्याचे काम पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे नववर्षात या कामाला आता वेग येणार आहे. ही कामे येत्या १५ दिवसात सुरू करावी लागणार असली तरी संपूर्ण नवनगराचे काम मार्गी लागण्यास जवळपास एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत १००७ हेक्टर क्षेत्र संपादीत झालेले असून खासगी भूसंपदान १२७ हेक्टर आहे. तेही वेगाने संपादीत करण्याचे काम चालू आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चार तालुक्यात समृद्धी महामार्ग ८७ किमी २९० मिटर गेलेला आहे. दरम्यान, जिल्ह्यात या मार्गासाठी लागणार्या जमिनीपैकी ९२ टक्के जमीन संपादीत करण्यात आली आहे. उर्वरित आठ टक्के जमीनही वेगाने संपादनाची हालचाल सुरू आहे. ही कामेही येत्या १५ दिवसात पूर्णत्वास नेण्याच्या सुचना दिल्या गेल्या आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक मधुसूदन खडसे यांनीही या माहितीस दुजोरा दिला आहे.

वनजमीन संपादनाचा फेज एक पूर्ण
समृद्धी महामार्गासाठी २८.३० हेक्टर वनजमीन संपादीत करावयाची आहे. ती संपादन करण्याच्या प्रक्रियेचा फेज एक पूर्ण झाला असून दुसर्या फेजचे कामही आता अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती समृद्धी महामार्गावर काम करणारे अधिकारी दिनेश गिते यांनी ‘लोकमत’शी बोलताा दिली.
सावरगाव माळ नवनगर कामास प्रथम प्रारंभ
सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ येथील नवनगराच्या मॅपींगसह अन्य कामास प्रथम प्रारंभ करण्यात येणार आहे. ५०० हेक्टरवर हे नवनगर अर्थात कृषी समृद्धी केंद्र राहणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कृषी, कृषी प्रक्रिया उद्योग, शाळा, महाविद्यालये, कोल्ड स्टोअरेज अशा सुविधा राहणार आहेत. जालना येथील ड्रायपोर्टच्या जवळच हे नवनगर असल्याने या नवनगराला नजीकच्या काळात चांगलेच महत्त्व येणार आहे. कृषी क्षेत्रातील नाशवंत माल येथे ठेवण्याचीही सुविधा पुढील काळात उपलब्ध होईल.

Web Title: Start of new city work in Buldana district soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.