पाच हजारांवरील गावात विलगीकरण कक्ष सुरू करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:35 AM2021-05-12T04:35:47+5:302021-05-12T04:35:47+5:30
आ. श्वेता महाले यांच्या अध्यक्षतेत १० मे रोजी चिखली तहसील कार्यालयात कोरोनाबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात तालुका प्रशासनाची बैठक पार पडली. ...
आ. श्वेता महाले यांच्या अध्यक्षतेत १० मे रोजी चिखली तहसील कार्यालयात कोरोनाबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात तालुका प्रशासनाची बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. आगामी काळातील संभाव्य धोका लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भाने आ. महालेंनी ही बैठक घेतली. बैठकीला उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे, गटविकास अधिकारी जाधव, न. प. मुख्याधिकारी अभिजित वायकोस, ठाणेदार गुलाबराव वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खान, वैद्यकीय अधीक्षक डॉ. खान, सीडीपीओ गवई, गटशिक्षण अधिकारी शिंदे, पंडितराव देशमुख, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, कुणाल बोंद्रे, शेख अनिस, संतोष काळे, शैलेश बाहेती यांची उपस्थिती होती. आरटीपीसीआर चाचणी अहवाल आठ-आठ दिवस मिळत नसल्याने चिखली येथे लॅबला मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर करणे, ग्रामीण भागात अलगीकरण कक्ष स्थापन करणे, चिखली येथील समर्पित कोविड हेल्थ रुग्णालय तातडीने सुरू होण्यासाठी निवासस्थानाची दुरुस्ती करणे, आदींसह इतर विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
खासगी दवाखान्याची बिले तपासणीसाठी लेखाधिकाऱ्यांची नियुक्ती!
खासगी डॉक्टर अव्वाच्या सव्वा बिले देऊन लूट करीत आहेत, या पार्श्वभूमीवर लेखाधिकाऱ्यांमार्फत बिले तपासण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही डॉक्टरची बिले तपासलेली नाहीत. त्यासाठी प्रत्येक दवाखानानिहाय लेखाधिकारी यांची नेमणूक करून त्यांचे बिले तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी चिखली नगरपालिका हद्दीतील खासगी डॉक्टर यांच्याकडून मिळालेली बिले तपासून लूट करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी हेल्पलाईन सेंटरसुद्धा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खते व बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर द्या!
खरीप हंगामासाठी खते व बियाणे घेण्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या बांधावर खते, बियाणे देण्यासाठी कृषी विभागाने सज्ज राहून खते व बियाण्यांची मागणी नोंदवून त्यांच्या बांधावर खते व बियाणे देण्याच्या सूचना आ. महाले यांनी या बैठकीत दिल्या.