बेरोजगारांना रोजगाराची वाट; जिल्हाभर मुद्रा योजनेच्या प्रचाराला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 03:31 PM2019-02-22T15:31:36+5:302019-02-22T15:31:56+5:30
बुलडाणा: मुद्रा बँक योजेनंतर्गत बेरोजगारांना रोजगाराची वाट दखविण्यात येत आहे. या योजनेचा प्रचार करण्यासाठी मुद्रा बँक योजना समन्वय समितीअंतर्गत जिल्ह्यात पाच प्रचार रथ काम करणार आहेत.
बुलडाणा: मुद्रा बँक योजेनंतर्गत बेरोजगारांना रोजगाराची वाट दखविण्यात येत आहे. या योजनेचा प्रचार करण्यासाठी मुद्रा बँक योजना समन्वय समितीअंतर्गत जिल्ह्यात पाच प्रचार रथ काम करणार आहेत. मुद्रा योजनेचे हे रथ गावोगावी पोहचाणार असल्याची माहिती आहे.
लघु उद्योग, छोटे कारखानदार आणि दुकानदार यासह बेरोजगार युवकांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज पुरवठा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०२५ मध्ये मुद्रा बँक योजना सुरू केली होती. या योजनेतून सुरूवातीला लघु उद्योजकांना १० लाखापर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध करून देण्यात आले; परंतू वर्ष अनेक ठिकाणी मुद्रा बँक योजनेला जिल्ह्यात घरघर लागल्याचे दिसून आले. बँकांनी या योजनेअंतर्गत कर्ज देण्यास नकार दिल्याने बेरोजगार युवकांनी या योजनेकडे पाठ फिरविली. मात्र आता पुन्हा शासनाने बुलडाणा जिल्ह्यात मुद्रा बँक योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी योजनेचा प्रचार करण्याचे काम हाती घेतले आहे. मुद्रा बँक योजना ग्रामीण, दुर्गम आणि अती दुर्गम भागात माहिती होण्यासाठी आणि या योजनेचा लाभ गरजू व होतकरू व्यक्ती आणि बेरोजगारांना व्हावा, यासाठी या योजनेचा प्रचार, प्रसार व समन्वयासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली मुद्रा बँक योजना समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रचार रथाचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. मुद्रा बँक योजना प्रचार व प्रसार करण्यासाठी मुद्रा बँक योजना समन्वय समितीअंतर्गत जिल्ह्यात पाच प्रचार रथ तयार करण्यात आले आहेत. मुद्रा योजनेचा जास्तीत जास्त लाभ सुशिक्षीत बेरोजगार युवकांना मिळावा व योजनेविषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी, हा उद्देश आहे. प्रचार रथ शुभारंभवेळी कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक गणेश चिमणकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक उत्तम मनवर, माहिती सहायक नीलेश तायडे, सहा. नियोजन अधिकारी सोनार, लिपिक तोमर आदी उपस्थित होते.
याठिकाणी पोहचणार रथ
मुद्रा योजनेचा प्राचार, प्रसार करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी प्रचार प्रसार रथ जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे मोठे गांव, आठवडी बाजारचे गाव तसेच खेडी लागून असलेल्या गावांमध्ये मुद्रा योजनेचा प्रचार करणार आहे.