कृषीमंत्री नसलेल्या राज्य सरकारला दुष्काळाचा गंध नाही- जयप्रकाश बाविस्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 06:20 PM2019-02-25T18:20:17+5:302019-02-25T18:20:37+5:30
शेतकर्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांची पूर्तता केली जावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना २७ फेब्रुवारी नंतर अधिक तीव्रतेने राज्यात आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार तथा अॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी येथे दिला.
बुलडाणा: दुष्काळी परिस्थिती असतानाही गेल्या नऊ महिन्यापासून राज्याला पूर्ण वेळ कृषीमंत्री नाही, यावरून हे सरकार दुष्काळ व शेतकर्याप्रती किती गंभीर आहे, याची कल्पना यावी. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ हे सरकारमधील मंत्रीसंत्री राजकारण करण्यात मशगूल आहेत. त्यामुळे राजकारण गेले चुलीत पण जगाचा पोशिंदा शेतकरी आधी जगला पाहिजे. त्यासाठीच दुष्काळ व्यवस्थापन संहीता ही मराठीमध्ये उपलब्ध करण्यात येऊन शेतकर्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांची पूर्तता केली जावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना २७ फेब्रुवारी नंतर अधिक तीव्रतेने राज्यात आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार तथा अॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी येथे दिला.
मराठी राजभाषा दिनीतरी किमान शेतकर्यांना समजले अशा आपल्या मराठी भाषेमध्ये २०१६ ची राज्याची दुष्काळ व्यवस्थापन संहिता उपलब्ध केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रश्नी राज्यात आंदोलन करत असून दर सोमवारी राज्यातील दुष्काळजाहीर झालेल्या १५१ तालुकाक्यात निवेदने देऊन याबाबत मागणी करण्यात आली आहे. पण महिना उलटूनही अद्याप त्यादृष्टीने राज्य शासनस्तरावर याबाबत कुठलीही हालचाल झाली नाही. तिसर्या सोमवारी निदर्शने निवेदने देऊन राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये आंदोलने केल्यानंतर चौथ्या सोमवारी यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तराव माहिती अधिकार टाकून ही मागणी करण्यात आली आहे.
दुष्काळाच्या अनुषंगाने मराठी राजभाषा दिनापर्यंत ही दुष्काळ व्यवस्थापन संहिता मराठीमध्ये उपलब्ध न केल्यास तथा दुष्काळी भागात गुरांसाठी चारा छावण्या उभारण्यासोबतच, चारा उत्पादनासाठी प्रयत्न, वृद्धनिराधारांसाठी अशा तालुक्यात स्वयंपाकगृह, रोहयो, मनरेगाची मागे उपलब्ध करून न दिल्यास मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. शासन उपाययोजना करण्यात कमी पडत असले तर मनसेचे तालुका व जिल्हास्तरावर प्रत्येकी पाच प्रतिनिधी देऊन यासाठी शासना आम्ही सहकार्य करू. पण त्यादृष्टीने शासनाने प्रयत्न करणे अभिप्रेत असल्याचे ते म्हणाले. दुष्काळ जाहीर होऊन साडेतीन महिने होऊनही अद्याप उपाययोजना हाती घेतल्या गेल्या नाहीत. त्या हाती घेण्यात याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा त्यांनी इशारा दिला.
तर तीव्र आंदोलन
निवेदने, निदर्शने करून लोकशाही मार्गाने आम्ही राज्यात आंदोलन करत आहोत. खळखट्याक, कायदा हातात घेऊन विध्वंसक आंदोलन आम्ही आंदोलने करतो असा आमच्यावर आरोप होतो. मात्र महिन्यांतरही आम्ही दिलेल्या निवेदनांची दखल घेतल्या जात नसले तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा मनसे नेते तथा माजी आमदार अॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी दिला.