राज्य सरकारचा नाबार्डसोबत सामंजस्य करार
By admin | Published: March 18, 2015 01:40 AM2015-03-18T01:40:14+5:302015-03-18T01:40:14+5:30
बुलडाणा जिल्हा बँक पुनरूज्जीवनाची प्रक्रिया; मुख्यमंत्र्यांनी केले ट्विट.
बुलडाणा : जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला मदत देण्याबाबत केंद्र सरकारने ५ नोव्हेंबर रोजी केलेली घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी राज्य सरकारचा केंद्र सरकार तसेच नाबार्डसोबत करारनामा होणे अपेक्षित आहे. हा करारनामा २0 फेब्रुवारी रोजी होणार होता; मात्र विविध कारणांमुळे तो लांबला होता. अखेर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिव्टरवर या सामंजस्य कराराबाबत स्वत: माहिती दिली असल्याने जिल्हा बँकेच्या पुनरूज्जीवनाचा मार्ग खुला झाला आहे. अडचणीत आलेल्या बुलडाणा, वर्धा, नागपूर जिल्हा बँकांना मदत करण्याची घोषणा ५ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली होती. ही घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी एमओयू म्हणजे (मेमॅरेन्डम ऑप अंडरस्डींग) अर्थात करारनामा होणे आवश्यक आहे. जिल्हा बँकेच्या पुनरूज्जीवनासाठी केंद्र सरकारसोबतच नाबार्डची भूमिका मोठी असल्याने या राज्य सरकारकडून या करारनामासंदर्भात मंगळवारी हालचाली झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, आ. डॉ. संजय कुटे यांच्या उपस्थितीत नाबार्डसोबत करारनामा झाल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्र्यांनी टिव्टरवर दिली आहे. त्यांनी याबाबत नमूद केले आहे की, नागपूर, वर्धा व बुलडाणा या तिन्ही जिल्हा बँकेच्या संदर्भा तील सामंजस्य करार झाला असून, दोन लाख ५0 हजार शेतकर्यांना कर्ज मिळण्यास या करारामुळे मदत होणार आहे. दरम्यान, पीएम घोषणेच्या अंमलबजावणीसाठीसुद्धा हा करार महत्त्वाचा ठरणार आहे; तसेच या करारामुळे जिल्हा बँकेच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेविरोधात नागपूर न्यायालयाच्या खंडपीठात सुरू असलेल्या खटल्यातही नाबार्डला न्यायालयात आपली भूमिका सादर करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.