महिला अत्याचाराच्या घटनांवरून राज्य सरकारचे वाभाडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:32 AM2021-03-08T04:32:37+5:302021-03-08T04:32:37+5:30
चिखली : सर्वत्र ८ मार्च राेजी जागतिक महिला दिन साजरा होत असताना राज्यातील महिलांवरील वाढते अत्याचार आणि हत्येचा ...
चिखली : सर्वत्र ८ मार्च राेजी जागतिक महिला दिन साजरा होत असताना राज्यातील महिलांवरील वाढते अत्याचार आणि हत्येचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तथापि अशा घटनांमधील मंत्र्यांना राज्य सरकार पाठीशी घालते आहे, असा आरोप करतानाच आमदार श्वेता महाले यांनी 'ट्विटर'व्दारे राज्य सरकारचे चांगलेच वाभाडे काढले आहे. आ. महालेंचे हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होत असून राज्य सरकारलाही चांगलेच झोंबणारे ठरले आहे.
राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, हत्यांच्या घटना आणि सरकारकडून मंत्र्यांची पाठराखण या पृष्ठभूमीवर आमदार श्वेता महाले यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप प्रगट केला आहे. आ. महालेंनी आपल्या ट्विटमध्ये 'पूजा चव्हाणने आत्महत्या केली, हिरेन मनसुखने आत्महत्या केली, जळगावच्या 'त्या' महिलेने गरमी होत होती म्हणून झगा काढून ठेवला होता. ज्यांच्यावर बलात्कार झालेत त्यात त्या महिलांची चुकी आहे, मुंडे, शेख, वाघमारे, राठोड अगदी निरागस आहेत आणि राज्याला धोका सचिन, लतादीदी, अमिताभ, अक्षयकडून आहे', अशा तीव्र शब्दांचा वापर करीत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. सध्याची परिस्थिती पाहता राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, हत्येच्या घटना आणि अशा प्रकारात नावे समोर आलेल्या मंत्र्यांची पाठराखण, या पृष्ठभूमीवर आमदार श्वेता महालेंनी उपरोक्त ट्विट करून आपला संताप व्यक्त केला आहे. आ. महालेंनी हे या ट्विट करताना अत्यंत भेदक शब्द व सरकारच्या वर्मी लागतील अशा शब्दांचा वापर केला असल्याने ते राज्य सरकारलादेखील झोंबणारे ठरले आहेत. आ. महालेंचे हे ट्विट शेकडो जणांनी रिट्विट करून त्यांचे समर्थनदेखील केले आहे.
शक्ती समितीतून बाहेर पडण्याचा दिला होता इशारा !
महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासंदर्भाने करण्यात येणाऱ्या 'शक्ती कायदा' विधेयकाबाबत विधानसभेचे १५ सदस्य आणि विधान परिषदेचे ६ सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. या सदस्यांमध्ये आमदार श्वेता महाले यांचा समावेश आहे. दरम्यान, वनमंत्री राठोड यांच्या राजीनाम्यासाठी या समितीतून भाजपाचे सर्व सदस्य बाहेर पडतील असा, इशारा यापूर्वी दिला होता. त्या पश्चात आता आ. महालेंनी अत्यंत खोचक शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे.