मेहकर एसडीओ कार्यालयातील स्टेनो एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:41 AM2021-09-04T04:41:42+5:302021-09-04T04:41:42+5:30
मेहकर तालुक्यातील वेणी शेतशिवारातील महिला तक्रारदारांनी त्यांच्या एकूण शेतीपैकी २० आर शेतजमीन विक्रीच्या परवानगीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज ...
मेहकर तालुक्यातील वेणी शेतशिवारातील महिला तक्रारदारांनी त्यांच्या एकूण शेतीपैकी २० आर शेतजमीन विक्रीच्या परवानगीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. हा परवाना देण्यासाठी आरोपी लघुलेखक मिलिंदकुमार सुदाम वाठोरे (५६) याने सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. महिलांनी ती लाच न देता बुलडाणा एसीबी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पडताळणी शुक्रवारी पंचासमक्ष करण्यात आली असता, लघुलेखक वाठोरे याने तक्रारदार महिलेकडून तडजोडीअंती तीन हजार रुपयांची लाच स्वीकारली. याचवेळी एसीबीने लाचखोर लघुलेखक वाठोरे यास अटक केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी, विलास साखरे, मोहम्मद रिजवान, पोलीस कॉन्स्टेबल विनोद लोखंडे, जगदीश पवार, नितीन शेटे यांनी केली.