कॉन्व्हेंटकडे जाणारे पाऊल आता ‘सीबीएसई’कडे!
By admin | Published: May 25, 2017 12:30 AM2017-05-25T00:30:38+5:302017-05-25T00:30:38+5:30
अमरावती विभागात सीबीएसईच्या ४७ शाळा : सीबीएसईमुळे कॉन्व्हेंटवरही संक्रांत
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : अमरावती विभागामध्ये सीबीएसई बोर्डाच्या जवळपास ४७ शाळा आहेत. या शाळेत इंग्रजीचे प्रभुत्व असल्याने पालकांचा सीबीएसईच्या आभ्यासक्रमाकडे ओढा आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदमधून कॉन्व्हेंटकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे पाऊल आता सीबीएसईकडे वळत आहे. सीबीएसईमुळे कॉन्व्हेंटवरही संक्रांत आली असून, कॉन्व्हेंटच्या शिक्षकांनाही विद्यार्थी शोध मोहीम राबवावी लागत आहे.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये कॉन्व्हेंटच्या पाठोपाठ आता सीबीएसई संस्कृती रुळत आहे. कॉन्व्हेंटने इंग्रजी माध्यमाचे शिक्षण खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवले. त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांना चांगलाच भोगावा लागत आहे. परंतु पूर्वी जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांचा ओढा कॉन्व्हेंटकडे होता; मात्रा आता या परिस्थितीमध्ये बदल होत आहे. आता कॉन्व्हेंट संस्कृतीच्या पलीकडे सीबीएसई बोर्डाच्या शाळांचे जाळे पसरले आहे.
महाराष्ट्र राज्यात सीबीएसई बोर्डाच्या जवळपास १५ ते १६ हजार शाळा असून, पश्चिम विदर्भात ४७ शाळा आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ११, अकोला जिल्ह्यात सात, वाशिम पाच, अमरावती १० व यवतमाळ जिल्ह्यात १४ शाळा सीबीएसई बोर्डाच्या आहेत. सीबीएसई बोर्डाच्या शाळेत इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्याच शिक्षकांचा भरणा केला जात असून, या शाळांचे आकर्षण पालकांना अधिक आहे. त्याचबरोबर भविष्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमाला महत्त्व असल्याने या शाळेकडे पालकांचा कल दिसून येतो. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदकडून कॉन्व्हेंटकडे वळणारे मुलं, सीबीएसई माध्यमाच्या शाळेकडे वळत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. कॉन्व्हेंटपेक्षा सीबीएसई माध्यमाच्या शाळेतील प्रवेश शुल्क जास्त असूनही पालक ते शुल्क भरण्यास तयार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या शाळा प्रत्येक शहराच्या ठिकाणी निर्माण होत असल्याने पालकांनाही आपल्या पाल्याला सीबीएसई बोर्डाचे शिक्षण देणे सोईचे झाले आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळेत केवळ शहरातीलच मुलांना टाकले जात नाही, तर ग्रामीण भागातील मुलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होत आहे. त्यामुळे कॉन्व्हेंटमधील मुले आता सीबीएसईमध्ये जात असल्याने कॉन्व्हेंटच्या शिक्षकांना विद्यार्थी शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी अडवणूक
सीबीएसई बोर्डाच्या शाळेकडे विद्यार्थी जात आहेत. त्यामुळे कॉन्व्हेंटमध्ये यापूर्वी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जायचे असेल, तर कॉन्व्हेंटमधून शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी संस्थाचालक व शिक्षकांकडून अडवणूक होत आहे. सीबीएसईच्या शाळेत जाण्यासाठी तयार असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे दाखले कॉन्व्हेंटच्या शाळेत अडकून पडले आहेत.
‘सीबीएसई पॅटर्न’च्या नावाखाली पालकांची फसवणूक
अमरावती विभागामध्ये जवळपास ४५ शाळा सीबीएसई बोर्डाच्या आहेत. परंतु शहराच्या ठिकाणी असलेल्या अनेक शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न असल्याचे सांगून विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेतले जात आहेत. ‘सीबीएसई पॅटर्न’च्या नावाखाली पालकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे पालकांनीही आपल्या पाल्याचा प्रवेश करण्यापूर्वी शाळांची योग्य खात्री करावी. तसेच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी शाळा सीबीएसई पॅटर्न आहे का, त्यावरील शिक्षकांचे शिक्षण आदी बाबींची सखोल चौकशी करणे गरजेचे झाले आहे.