Sting Operation : किराणा दुकानातूनही मिळतोय गुटखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 02:31 PM2020-03-11T14:31:03+5:302020-03-11T14:31:25+5:30
दुकानावरही सहज गुटखा मिळत असल्याचा प्रकार ९ मार्च रोजी ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनमुळे समोर आला आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन मंत्री पद आल्यापासून जिल्ह्यात गुटखा विक्रीवर कारवाईचे सत्र सुरू झाले. परंतू आता पुन्हा गुटखा विक्रेते डोकेवर काढत आहेत. जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरातही गुटख्याची विक्री होत आहे. पानटपरीतच नव्हे, तर किराणा दुकानावरही सहज गुटखा मिळत असल्याचा प्रकार ९ मार्च रोजी ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनमुळे समोर आला आहे. त्यामुळे कारवाईनंतरही गुटखा विक्री होते तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यात मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा, गुजरात राज्यातून गुटखा येतो. जिल्ह्यातही परजिल्ह्यातून गुटखा येतो. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर प्रथमत: बुलडाणा जिल्ह्यात गुटखा बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम हाती घेतले.
एक महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये गुटखा विक्रीशी संबंधितांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यासदंर्भात निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात कुठेही अवैध गुटखा विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यापूर्वी अनेकवेळा केले. तरीसुद्धा जिल्ह्यात गुटखा बंदीला खो बसत असल्याचे दिसून येत आहे. बुलडाण्यातील काही किराणा दुकानावर गुटखा पुड्या मागितल्या असता सहज उपलब्ध झाल्या. काहींनी चोरून ठेवलेला माल आता विक्रीसाठी बाहेर काढल्याचे दिसून आले.
असे झाले स्टिंग
बुलडाणा शहरातील काही किराणा दुकान व पानटपरीवर ९ मार्च रोजी ‘लोकमत’ प्रतिनिधींनी भेट दिली.
त्याठिकाणी गुटखा पुड्या मागितल्या असता, त्या सहज मिळून आल्या. किराणा दुकानातूनही साध्या कागदाच्या पुडीमध्ये गुटख्याची पुडी देण्यात आली.
१० रुपयात तीन पुड्या
४१० रुपयांमध्ये तीन गुटखा पुड्या दिल्या जातात. तर मोठी पुडी असल्यास एका पुडीचे सहा रुपये लावले जातात. वेगवेगळ्या कंपनीच्या पुड्यांचे वेगवेळे दर आहेत. काही पुड्यांवर पुडीचे नाव वगळता किंमत, मुदत, पुडीचे वजन अशी कुठलीच माहिती दिसून आली नाही.
जिल्ह्यात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरूच असते. अनेक जण गुप्त महिती देतात त्यावरूनही कारवाई करण्यात येते.
- एस. डी. केदारे,
सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन बुलडाणा.