Sting Operation : आरोग्य सेवेचा फज्जा; प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 03:00 PM2018-11-28T15:00:45+5:302018-11-28T15:01:29+5:30
खामगाव / शेगाव : ग्रामिण भागातील रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र जिल्हयात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजलेले ‘लोकमत’च्या स्टींग आॅपरेशनमध्ये सोमवारी रात्री ७ वाजता दिसून आले.
योगेश फरपट /अनिल उंबरकार
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव / शेगाव : ग्रामिण भागातील रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र जिल्हयात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजलेले ‘लोकमत’च्या स्टींग आॅपरेशनमध्ये सोमवारी रात्री ७ वाजता दिसून आले.
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मातामृत्यू बालमृत्यू टाळण्यासाठी तसेच अपघातामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी ग्रामिण भागातील रुग्णांचा जीव वाचावा या उद्देशाने प्राथमिक उपचाराची सुविधा नव्हेतर प्रसुतीसह शस्त्रक्रीया, लसीकरण आदी सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत पुरविण्यात येतात. त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ व अत्याधुनिक यंत्रसामुग्री सुद्धा लाखो रुपये खर्चुन उपलब्ध करून दिली जाते. जिल्हयात सुद्धा प्रत्येक तालुक्याला १० गावामिळून एक प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे. शेगाव तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जवळा बु. येथेही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मात्र डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णसेवा केवळ कागदावरच मिळत असल्याचे येथील नागरिक रामराव देशमुख यांनी सांगितले. नागरिकांना रुग्णसेवा मिळत नसल्यानंतरही रुग्ण कल्याण समितीचेही याप्रकाराकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. त्यामुळेच डॉक्टरांचे चांगले फावत आहे. शासन प्राथमिक आरोग्य केंद्रावर लाखो रुपये खर्च करते. मात्र आरोग्य विभागाच्या वैद्यकीय यंत्रणेमुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
ग्रीलडोअर उघडे, खोल्यांना कूलूप
प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रवेशद्वार वा ग्रीलडोअर उघडे आढळले तर दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाºयाच्या कक्षासह ईतर सर्व खोल्यांना कूलूप लावलेले दिसून आले.
दोन्ही डॉक्टरांची अनुपस्थिती
या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. जनक बनसोड व डॉ. ज्योती पवार हे कार्यरत आहेत. सोमवारी रात्री ७ ते ९ वाजेदरम्यान हे दोन्ही डॉक्टर अनुपस्थित आढळून आले. त्यांच्याशिवाय एकही आरोग्य कर्मचारी उपस्थित आढळून आला नाही.
जवळा बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. असतील तेवढ्यातच कुठेतरी. तुम्ही थांबा, कुठेही जावू नका. पाच मिनिटात डॉक्टरांना पाठवतो.
- डॉ. प्रविण घोंगटे, तालुका आरोग्य अधिकारी, शेगाव