Sting Operation : हॉटेलमध्ये नियम धाब्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:18 PM2020-06-19T12:18:11+5:302020-06-19T12:26:46+5:30
ग्राहकांना बसून नास्ता आणि जेवणही दिल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले.
अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोना अनलॉक कालावधीत स्वीटमार्ट आणि नास्त्याचे हॉटेल उघडण्यास मनाई असतानाही शहरात राजरोसपणे हॉटेल आणि स्वीटमार्ट उघडल्या जाताहेत. इतकेच नव्हे तर या व्यावसायिक प्रतिष्ठांनामध्ये ग्राहकांना बसून नास्ता आणि जेवणही दिल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये गुरूवारी समोर आले. त्याचवेळी नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ शहराच्या विविध भागात किराणा दुकानेही सुरू ठेवल्या जात असल्याचे दिसून येते. याप्रकाराकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.
कोरोना विषाणू संसर्गामुळे गत काही महिने शहरातील विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. दरम्यान अनलॉक सुरू झाल्यानंतर काही व्यावसायिकांना ठराविक वेळेत दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यामध्ये नास्ता, जेवणावळ आणि हॉटेल व्यावसायिकांसह सलून व्यावसायिकांना वगळण्यात आले आहे. हॉटेल व्यावसायिकांना तयार मालाची पार्सल आणि होम डिलीव्हरीसाठी मुभा राज्य शासनाकडून दिली आहे. मात्र, खामगाव शहरातील हॉटेल व्यावसायिकांसह नास्ता विक्रेते चक्क दुकानात ग्राहकांना बसवून खाद्य पदार्थ देताहेत.
शहरातील मुख्य रस्त्यांसह बसस्थानक परिसर, नांदुरा रोड परिसरात खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडून नियमांचा भंग केल्या जात आहे. याकडे खामगाव नगर पालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाचेही अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
असे केले स्टींग ऑपरेशन!
नियमावलीच्या उल्लंघनाचा प्रकार दिसून येताच, शहरातील हॉटेल तसेच खाद्य पदार्थ विक्रीच्या दुकांनांवर ‘लोकमत’चमूने भेटी दिल्या. त्यावेळी टिळक पुतळा, अग्रसेन चौक, नांदुरा रोड, बसस्थानक परिसर, गांधी चौकात अनेक दुकाने उघडी असल्याचे दिसून आले. या दुकानांमध्ये ग्राहकांना बसवून सुविधा दिल्या जात असल्याचे दिसून आले. तर नामांकित हॉटेलमध्ये खाली विक्री आणि याच मालकाच्या रेस्ट हाऊसमध्ये वरच्यामाळ्यावर बसण्याची सुविधा असल्याचे आढळून आले. पालिकेकडून शहरातील व्यावसायिकांवर कारवाई करण्यास विलंब करण्यात येत आहे.
पोलिस स्टेशन जवळील एका हॉटेलात वेगळी व्यवस्था
शहरातील एका नामांकित व्यावसायिकांकडून तयार नास्त्याची विक्री जोरात सुरू आहे. या व्यावसायिकाने दुकानाच्या वरच्या माळ्यावरील रेस्टहाऊसमध्ये ग्राहकांना बसण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शहर पोलिस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या हॉटेलमधील प्रकाराकडे शहर पोलिस आणि पालिकेचे दुर्लक्ष आहे.
पालिका आणि पोलिसांकडे तक्रारी!
शहरातील हॉटेल व्यावसायिक तसेच खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडून शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे भंग केल्या जात आहे. याबाबत काही सुजान नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्यात. मात्र, संबंधित प्रशासनाकडून हा प्रकार गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचे दिसून येते. गुरूवारी खामगावातील आठवडी बाजाराच्या दिवशी शहरात अनेकठिकाणी खाद्यपदार्थांची विक्री करण्यात आल्याचे चित्र दिसून आले.