Sting Operation : कार्यालयात तलाठी गैरहजर; नागरिकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 04:28 PM2019-08-02T16:28:34+5:302019-08-02T16:29:02+5:30
खामगाव : एकीकडे हलक्याऐवजी शहरात थाटलेल्या कार्यालयातही तलाठी हजर राहत नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : एकीकडे हलक्याऐवजी शहरात थाटलेल्या कार्यालयातही तलाठी हजर राहत नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे तलाठी केव्हा येणार याची माहितीही नागरिकांना मिळत नसल्याने करावे तरी काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
खामगाव शहरातील माखरीया मैदान परिसरात तलाठ्यांचे कार्यालय आहे. खेड्या-पाड्यातील नागरिकांच्या सोयीसाठी हलक्याच्या ठिकाणी राहणे सोडून अनेक तलाठी या कार्यालयातूनच तलाठी त्यांचा कारभार सांभाळतात. त्यामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांना त्यांच्या कामासाठी ३०-३० किलोमीटरपर्यंत प्रवास करून खामगावात यावे लागते. खामगाव शहरातील कार्यालयात आल्यानंतरही तलाठ्याची भेट होईल, याची काहीही शक्यता नाही. कोणी कुठे तर कोणी कुठे असा सर्व प्रकार पाहावयास मिळत आहे. गुरूवारी बाजारच्या दिवशी हा प्रकार पाहावयास मिळाला. तलाठी कार्यालयात कामानिमित्त अनेक नागरिक आले होते. परंतु तलाठी हजर नसल्याने प्रतीक्षा करण्या पलीकडे त्यांच्याकडे काहीही इलाज नव्हता. तलाठी कार्यालय, खामगाव असे लिहिलेल्या कार्यालयात तलाठीच हजर नव्हते. याबाबत माहिती द्यायलाही कोणी तयार नव्हते. शेवटी आसनकर तलाठी येथे कार्यरत असल्याचे कळाले.
याच कार्यालया शेजारी आणखी एक तलाठी कार्यालय आहे. त्या कार्यालयात तलाठी कार्यालया लोणी गुरव, दस्तापूर, बोथाकाजी, सावरखेड असे लिहिलेले दिसले. या कार्यालयात चौधरी आणि पल्हाडे तलाठी कार्यरत असल्याचे कळाले तसेच दोन महिला कर्मचारी दिसून आल्या. चौधरी आणि पल्हाडे तलाठी केव्हा येणार, असे त्यांना विचारले असता, त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. अशीच वागणूक येथे कामानिमत्त येणाºया नागरिकांना मिळत असते. त्यामुळे परिसरातील शेतकरी प्रचंड त्रस्त झाले असल्याचे दिसून येत आहे. तहसीलदारांनी लक्ष द्यावे व तलाठ्यांना कार्यालयात थांबण्याबाबत आदेश द्यावे, अशी मागणी होत आहे.
असे करण्यात आले स्टिंग आॅपरेशन!
खामगाव शहरातील माखरीया मैदान पसिरात असलेल्या तलाठी कार्यालयात तलाठी गैरहजर राहतात तसेच दुपारी लवकरच कार्यालय बंद करण्यात येते; अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने तलाठी कार्यालयात जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी खामगावचे तलाठी गैरहजर दिसून आले. तर बोथाकाजीसह परिसरातील तलाठ्याचे कार्यालयात दुपारी ३ वाजताच बंद करण्यात आल्याचे दिसून आले.
दुपारी ३ वाजताच केले कार्यालय बंद!
खामगाव शहरातील माखरीया मैदान परिसरातील चौधरी आणि पल्हाडे हे गुरूवारी कार्यालयात दिसून आले नाही. कार्यालयात दोन महिला कर्मचारी दिसून आल्या. विशेष म्हणजे त्या दुपारी ३ वाजताच कार्यालयाला कुलूप लावून निघून गेल्या. येथे कामानिमित्त आलेल्या एका शेतकºयाला कार्यालयाच्या वेळेबाबत विचारले असता, सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालयाची वेळ असल्याचे सांगितले. यावरून कार्यालयाच्या वेळा किती कोटेकोरपणे पाळल्या जातात हे दिसून येते.
तलाठी नागरिकांना नियमित सेवा देण्याचा प्रयत्न करतात. काही कारणास्तव तलाठी बाहेर गेले असतील, तरीसुध्दा सदर प्रकाराची दखल घेऊन तलाठ्याला जाब विचारण्यात येईल.
- शितलकुमार रसाळ
तहसीलदार, खामगाव.