स्टिंग आॅपरेशन: खामगावात वाहतुक पोलिसांची खासगी वाहन चालकांकडून हप्ता वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 03:16 PM2018-08-28T15:16:46+5:302018-08-28T19:52:24+5:30
खामगाव: वाहतूक पोलिसांकडून दुचाकी वाहनधारकांना वेठीस धरल्या जात असल्याचा प्रकार गेल्याच आठवड्यात उजेडात आला. या धक्कदायक प्रकाराचा धुराळा खाली बसत नाही तोच, वाहतूक पोलिसांकडून काळीपिवळी आणि इतर खासगी वाहन धारकांकडून ‘हप्ता’ वसुली केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: वाहतूक पोलिसांकडून दुचाकी वाहनधारकांना वेठीस धरल्या जात असल्याचा प्रकार गेल्याच आठवड्यात उजेडात आला. या धक्कदायक प्रकाराचा धुराळा खाली बसत नाही तोच, वाहतूक पोलिसांकडून काळीपिवळी आणि इतर खासगी वाहन धारकांकडून ‘हप्ता’ वसुली केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
कारवाई टाळण्यासाठी तसेच वाहन सोडून देण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गेल्याच आठवड्यात उघडकीस आला. याप्रकरणी व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ-पाटील यांनी खामगाव येथील वाहतूक शाखेच्या दोन पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले. मार्गारेट हंस आणि गणेश जाधव यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचे प्रकरण ताजे असतानाच, वाहतूक पोलिस खासगी प्रवासी वाहन धारकांकडून हप्तावसुली केली जात असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले. शहरातील काही खासगी प्रवासी वाहतूक थांब्यावर पाहणी केली असता, वाहतूक पोलिस नियमित खासगी प्रवासी वाहन धारकांशी चर्चा करतात. बाहेर चर्चा केल्यानंतर एका वाहनात बसून पैसे स्विकारत असल्याची धक्कादायक बाब यावेळी उघडकीस आली. यासंदर्भातील काही पुरावे ‘लोकमत’च्या हाती लागलेत. तर सामान्य वाहन धारकांच्या तुलनेत प्रवासी वाहतूक करणाºया वाहनधारकांशी वाहतूक पोलिसांची वागणूक अतिशय सौजन्यपूर्वक असल्याचेही यावेळी दिसून आले. ही बाब पोलिस विभागातील अधिकाºयांच्या कानावर टाकली असता, यासंदर्भात त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया देण्याचे टाळत, कानावर हात ठेवले.
चिरीमिरीतून खासगी वाहतुकीला अभय!
खामगाव शहरासह परिसरातील बेशिस्त वाहतुकीला पोलिसांची हप्ता वसुली कारणीभूत असल्याचे दिसून येते. वाहतूक पोलिस विविध मार्गावर धावत असलेल्या काळी-पिवळी वाहनांसह प्रवासी वाहतूक करणाºया आॅटोधारकांकडून विशिष्ट रक्कम वसूल करतात. या वाहन धारकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई वाहतूक पोलिसांकडून केली जात नाही. त्यामुळे परिसरात अवैध प्रवासी वाहतूक पोफावत असल्याची ओरड होत आहे.
गर्दीच्या मार्गावरील ‘रेट’ अधिक!
खामगाव-नांदुरा, खामगाव- बुलडाणा, खामगाव- लाखनवाडा, खामगाव-पिंपळगाव राजा, खामगाव- शेगाव या मार्गावर मोठ्याप्रमाणात खासगी प्रवासी वाहतूक केली जाते. यामध्ये खामगाव-शेगाव आणि खामगाव नांदुरा या मार्गावर प्रवाशांची चांगलीच गर्दी होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून या मार्गावरील वाहन धारकांकडून इतर मार्गाच्या तुलनेत अधिक दर आकारण्यात येत असल्याचा दावा एका वाहन चालकाने नाव छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी केला.
बाहेर चर्चा; वाहनात घेतले जातात पैसे!
खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहन धारकांशी बाहेर चर्चा केल्यानंतर प्रवासी थांब्यावर उभ्या असलेल्या एकाद्या वाहनात बसून वाहतूक पोलिस पैसे स्विकारतात. त्यामुळे आलेल्या दुचाकीने निघून जात असल्याची वस्तुस्थिती थोड्याफार फरकाने सर्वच खासगी वाहतुकीच्या थांब्यावर दिसून येते.