लांजुड येथील उपोषणकर्त्यांवर रात्रीच्या अंधारात दगडफेक
By सदानंद सिरसाट | Published: January 14, 2024 06:06 PM2024-01-14T18:06:05+5:302024-01-14T18:06:20+5:30
गावातीलच काही समाजकंटकांनी शनिवारी मध्यरात्री उपोषण मंडपावर दगडफेक केली.
खामगाव (बुलढाणा): गावातील देशी दारू दुकान हटविण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालय चौकात उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित पोलिसावर शनिवारी रात्री १०.४७ वाजता दगडफेक केल्याची घटना तालुक्यातील लांजुड येथे घडली. याप्रकरणी दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करा, या मागणीसाठी उपोषणकर्त्याने जलंब पोलिसांत तक्रार दिली आहे.
लांजुड गावातील तरुणांमध्ये वाढती व्यसनाधिनता, त्यातून होणारे वाद टाळण्यासाठी गावातील देशी दारूचे दुकान हटवावे, या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून उमेश निवृत्ती जस्ताब यांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा शनिवारी तिसरा दिवस होता. गावातील नागरिकांच्या हितासाठी उपोषण असल्याने ग्रामस्थांचा दैनंदिन पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे गावातीलच काही समाजकंटकांनी शनिवारी मध्यरात्री उपोषण मंडपावर दगडफेक केली. त्यावेळी उपोषणकर्ता उमेश जस्ताबसह गस्तीवर असलेले एक पोलिस काॅन्स्टेबल, गावातील गजानन कोतवाल, विनायक ठाकरे, संतोष मालठाणे, गोपाल चव्हाण, भगवान मालठाणे, अनंता शिंदे मंडपात उपस्थित होते. अंधाराचा फायदा घेत अज्ञातांनी दगडफेक केली. यावेळी मंडपात उपस्थित असलेल्यांनी प्रसंगावधान राखत बचाव केला. त्यामुळे कोणालाही काही इजा झाली नाही. दगडफेक करणाऱ्यांचा काही लोकांनी पाठलाग केला. मात्र, अंधारात ते पळून गेले. घटनेची माहिती गावात मिळताच नागरिक प्रचंड संतप्त झाले. नागरिकांनी उपोषणस्थळी गर्दी केली. तसेच दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली. सोबतच जलंब पोलिसांत तक्रार दिली आहे.
अतिक्रमणाच्या जागेत दारू दुकान
गावात सुरू असलेल्या देशी दारू दुकानाच्या जागेच्या मालकीचा आठ-अ नमुना अवैध असल्याची माहिती उपोषणकर्त्याने वरिष्ठ कार्यालयात दिली आहे. त्यामुळे त्या आठची नोंद कोणत्या सरपंच आणि सचिव यांनी कशाच्या आधारे घेतली, हा मुद्दा आता उघड होणार आहे. गावात असलेल्या रेकॉर्डमध्ये कोणताही फेरबदल त्यांना करता येणार नाही. त्यामुळे आता संबंधित सरपंच, सचिवही कारवाईच्या कचाट्यात अडकणार आहेत.