सरसकट वीज बिल माफ करून वीज तोडणी तत्काळ थांबवा - आ.श्वेता महाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:33 AM2021-03-21T04:33:52+5:302021-03-21T04:33:52+5:30
महाविकास आघाडी सरकारने वीज बिलांची सक्तीची वसुली चालविली आहे. या पृष्ठभूमीवर आ. श्वेता महाले यांनी २० मार्च रोजी त्यांच्या ...
महाविकास आघाडी सरकारने वीज बिलांची सक्तीची वसुली चालविली आहे. या पृष्ठभूमीवर आ. श्वेता महाले यांनी २० मार्च रोजी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधून सरकारला या मोहिमेविरोधात कडक शब्दात इशारा दिला आहे. गत वर्षभरापासून सर्व नागरिक कोरोनामुळे त्रस्त आहेत. अनेकांचा रोजगार बुडाला, अद्यापही अनेक हातांना काम नाही, अशा स्थितीत सरकारने प्राधान्याने सर्वांना दिलासा देणे गरजेचे असताना लॉकडाऊन काळातील वीज बिले सरासरी व अव्वाच्या सव्वा वाढीव देऊन राज्य सरकारच जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहे. आधी लॉकडाऊन काळातील बिले माफ करू, असे आश्वासन यांनी दिले होते; मात्र आता घुमजाव करून बिले माफ करणे, तर दूरच त्यावर व्याज आकारणी करून सरकारने मोगलाई आणली आहे, असा घणाघात आ.महाले यांनी केला. जाहीरनाम्यात १०० युनिटपर्यंत मोफत वीज देऊ, अशी वल्गना करणारे आता वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांची जोडणी तोडण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप आ.महाले यांनी या पत्रकार परिषदेत केला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, अंकुशराव तायडे यांची उपस्थिती होती.
सरकारने दुटप्पीपणा तातडीने थांबवावा!
या मागणीसाठी गत महिन्यात भारतीय जनता पक्ष जेलभरो आंदोलनाच्या तयारीत होता. तेव्हा सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत शब्द देऊ, असे सांगितले होते. तथापि, शिवजयंती दरम्यान संचारबंदीमुळेही आंदोलन स्थगित करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी अधिवेशनादरम्यान कोणाचीही वीज कापल्या जाणार नाही, असा शब्द दिला होता. ऊर्जामंत्र्यांनी ही बाब मान्य केली होती; मात्र आता सर्वसामान्यांना वेठीस धरल्या जात आहे. सरकारने हा दुटप्पीपणा तातडीने थांबवावा व नागरिकांना दिलासा द्यावा, असेही आ.महाले यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.