औषध विक्रेत्यांना त्रास देणे बंद करा - नावंदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:33 AM2021-05-17T04:33:07+5:302021-05-17T04:33:07+5:30
चिखली : पाेलीस प्रशासनाकडून हाेत असलेला त्रास न थांबवल्यास नाईलाजास्तव व्यवसाय बंद करावा लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य ...
चिखली : पाेलीस प्रशासनाकडून हाेत असलेला त्रास न थांबवल्यास नाईलाजास्तव व्यवसाय बंद करावा लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी प्रशासनास दिला आहे़
बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे़. यामध्ये औषधी विक्रेते आपली सेवा अहोरात्र देत आहेत. त्या काळात अत्यावश्यक सेवेतील मेडिकल दुकानदारांना आपल्या सेवा देत असताना पोलीस प्रशासनाकडून मेडिकल दुकानदार व कर्मचारी यांच्यावर नाहक कारवाई होत आहे. यासंदर्भात चिखली, मेहकर, लोणार, मलकापूर, खामगाव येथून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील काेराेना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात १० मे रोजीपासून २० मेच्या सकाळपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहे़. या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून मेडिकल स्टोअर २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांनी आदेशाद्वारे दिली आहे. मात्र जिल्ह्यातील पोलीस प्रशासन मेडिकल व्यवसायाशी संबंधित व्यक्तींवर चौकशी न करता कारवाईचा बडगा उगारत आहे. याबाबत ११ मे रोजी मलकापूर येथील मेडिकलचे कर्मचारी व मुलगा औषधी पोहोचवण्यासाठी जात असताना त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन त्यांना आरटीपीसीआरचा अहवाल मागण्यात आला. तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. लोणार येथे प्रतिष्ठित औषधी विक्रेत्याला मारहाण केली. चिखली येथील औषधी विक्रेता दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून होणारा त्रास थांबला नाही, तर आम्हाला आमचा व्यवसाय बंद करावा लागेल, असा इशारा महाराष्ट्र केमिस्ट संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी प्रशासनाला दिला आहे.