देऊळगाव कुंडपाळ येथील अवैध दारु विक्री बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:14 AM2021-09-02T05:14:34+5:302021-09-02T05:14:34+5:30
कुटुंबाला आनंदाने व निर्व्यसनी जीवन जगता यावे यासाठी आपल्या स्तरावरुन आमच्या गावातील अवैध दारु विकी बंद करुन त्यांच्यावर योग्य ...
कुटुंबाला आनंदाने व निर्व्यसनी जीवन जगता यावे यासाठी आपल्या स्तरावरुन आमच्या गावातील अवैध दारु विकी बंद करुन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत सदस्या नंदा परमेश्वर राठोड, अलका जंगलसिंग राठोड यांच्यासह ४२५ महिलांनी केली आहे. निवेदनात नमूद आहे की, लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील रमेश हरिभाऊ चव्हाण व प्रकाश गोपा राठोड हे गावात अवैध दारु विकी करतात. या अवैध दारु विक्रीमुळे हजारो कुटुंबातील पुरुषांना व १५ ते २० वयोगटातील मुलांना दारुचे व्यसन जडले आहे. त्यामुळे अनेकांच्या कुटुंबात शांतता न राहता वादविवाद, तंटे, भांडण वाढत आहे. तसेच या दारुमुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत असून, आर्थिक परिस्थिती हलाखीची होत आहे. नवीन पिढीतील अनेक मुले शिक्षणाच्या दिशेने न जाता दारुच्या,व्यसनाच्या आहारी जात आहे. तसेच गावात दारु पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस जास्त वाढत असल्यामुळे गावातही शांततेचे वातावरण राहत नाही तरी या सर्व बाबींचा विचार करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
गावातील शांतता व सुव्यवस्थेसाठी, तरुण पिढीला व्यसनापासून रोखण्यासाठी ३० ऑगस्ट रोजी याबाबत ग्रामपंचायतीने सुद्धा अवैध दारू विक्री बंद करण्याबाबत ठराव घेतला आहे.
- शेषराव डोगरे, सरपंच, ग्रामपंचायत देऊळगाव कुंडपाळ.