जिल्हाभर कॉग्रेसचे रास्ता रोको आंदोलन
By admin | Published: May 19, 2017 07:51 PM2017-05-19T19:51:06+5:302017-05-19T23:49:58+5:30
बुलडाणा : तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात १८ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास दुसऱ्या दिवशीही सुरूच होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात १८ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. या उपोषणाला पाठींबा म्हणून शुक्रवारी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी १९ मे रोजी जिल्हाभर रास्ता रोको केला.
जिल्हयात शासकीय यंत्रणेव्दारे सुरू असलेली तूर खरेदी शासनाच्या धरसोड धोरण व शासकीय अधिकाऱ्यांच्या वेळकाढू व उदासीन धोरणामुळे रखडली असून तूर उत्पादक शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारी व प्रचंड त्रासदायक ठरली आहे़ संथगतीने तुरीचे मोजमाप व बारदाण्याचा अभाव, मोजणीसाठी काटयाचा अभाव, अधिकाऱ्यांची बेपर्वा वृत्ती, खरेदीसाठी हेतुपुरस्सरपणे केली जाणारी दिरंगाई आणि खरेदी झालेल्या तुरीचे पैसे देण्यास होणारा अक्षम्य विलंब यामुळे शेतकरी बेजार झालेले आहे़ ३१ मे पर्यंची मुदतवाढ दिली असली तरी आजवर २२ एप्रिल पर्यंत खरेदी केंद्रावर आणलेल्या तुरीचेही मोजमाप झालेले नाही. तर महिना उलटूनही १० एप्रिलपर्यंत खरेदी झालेल्या तुरीचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाहीत अशी स्थिती आहे़ तरी चुकारे त्वरीत मिळावेत आणि आलेला खरीप हंगाम पाहता खरेदी करावयाच्या तुरीचे आगाऊ चुकारे देण्यात यावेत, या मागणीसाठी १८ मे पासून बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्ते व शेतकरी यांच्या उपस्थितीत सुरू केले उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरू होते. यावेळी आंदोलनात तुकाराम बिडकर, बुलडाणा अर्बनचे डॉ.सुकेश झंवर, सुरेशदादा सोनुने, शाम उमाळकर, बाबुराव पाटील, दिलीपकुमार सानंदा, विजय अंभोरे, प्रा.नरेंद्र खेडेकर, नगराध्यक्ष हरिष रावल, संजय राठोड, जि.प.सदस्या जयश्री शेळके, लक्ष्मणराव घुमरे, डॉ़ रविंद कोलते, दिपक देशमाने, माणिकराव जाधव, समाधान हेलोडे, नंदकिशोर बोरे, प्रकाश धुमाळ, अॅड.शरद राखोंडे, राजु काटीकर, संजय पांढरे, रिजवान सौदागर, अत्तरोद्यीन काझी, रामदास मोरे, प्रमिला गवई, उषा चाटे, मिनल आंबेकर, देवानंद पवार, चित्रागंण खंडारे, प्रा.संतोष आंबेकर आदींनी पाठींबा दिला. तर तहसीलदार सुरेश बगळे, जिल्हा मार्केटींग अधिकारी शिंगणे यांनी उपोषण मंडपाला भेटी दिल्या.
मोताळा: काँगे्रस कार्यकर्त्यांना केले स्थानबद्ध
आ. बोंद्रे व त्यांचा १४ सहकाऱ्यांसोबत १७ मेपासून बुलडाणा येथे उपोषणाला सुरुवात केली. जिल्हा काँग्रेसच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोताळा तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने स्थानिक बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष अनिल खाकरे, जि.प. सदस्य जयश्री शेळके, गणेश राजपूत, इरफान पठाण, उखा चव्हाण, कैलास गवई, मिलिंद अहिरे, जब्बार खा, किशोर न्हावकर, एकनाथ खर्चे, मिलिंद जैस्वाल, राजेश गवई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शांतता सुव्यवस्था रहावी म्हणून आंदोलनकर्त्यांना बोराखेडी पोलिसांनी अटक करून स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
देऊळगावराजा: नागपूर-पुणे महामार्ग जाम
तालुका व शहर काँग्रेच्या कमिटीच्या वतीने १९ मे रोजी स्थानिक बसस्थानक चौकात नागपूर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सदर महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली. स्थानिक बसस्थानक चौकात सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करून विविध मागण्याचा निवेदन तहसीलदार यांना दिले. यावेळी यावेळी शहराध्यक्ष हनिफ शाह, मलकाप्पा लंगोटे, प्रवीण गुप्ता, अतिष कासारे, ईस्माईल बागवान, मो. रफीक, डॉ. इकबाल कोटकर, अजहर खान, फारुक शाह, छगन खरात, नितीन कायंदे, मुबारक खान, सुनील इंगळे, अमोल पवार, शेख खालेद आदी काँगे्रस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोणार: शांततामय मार्गाने रस्ता रोको
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे यांच्या उपोषणाच्या समर्थनात काँग्रेस तालुका अध्यक्ष सुभाष सोनुने यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेसने १९ मे रोजी बस्थानकासमोर शांततामय मार्गाने रस्ता रोको आंदोलन केले. ३१ मेपर्यंत तूर खरेदीची मुदतवाढ दिली असली खरेदीसाठी विलंब होत आहे. तरी तूर खरेदी करून चुकारे देण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी शहर अध्यक्ष शांतीलाल गुगलिया उपनगराध्यक्षपती बादशाह खान, काँग्रेस नेते नितीन शिंदे,जि.प. सदस्य राजेश मापारी, आरोग्य सभापती शेख समद, नगरसेवक प्रा. गजानन खरात, नगरसेवक सुदन कांबळे, प्रकाश धुमाळ, सतीश राठोड, साहेबराव पाटोळे, रामचंद्र कोचर, पंढरी चाटे, शेख असलम, पिंटू जायभाये उपस्थित होते.