जिभेचे लाड थांबवा; तिखट, मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:41 AM2021-09-04T04:41:22+5:302021-09-04T04:41:22+5:30
जिल्ह्यात अल्सरच्या रुग्णसंख्येचे प्रमाण नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. अलीकडच्या काळात गोडपेक्षा तिखट व मसालेदार पदार्थ खाण्याला नागरिकांकडून पसंती दिली ...
जिल्ह्यात अल्सरच्या रुग्णसंख्येचे प्रमाण नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. अलीकडच्या काळात गोडपेक्षा तिखट व मसालेदार पदार्थ खाण्याला नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे. मात्र अतिप्रमाणात तिखट खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आहारात तिखट पदार्थांचा समावेश अधिक असलेल्यांना अल्सर आजाराचा त्रास उद्भवल्याचे अनेक प्रकार सध्या समोर येत आहेत.
काय आहेत लक्षणे...
पोट दुखणे
मळमळ होणे
उलट्या होणे
भूक मंदावणे
काळी शौच होणे
ॲसिडिटी वाढणे
पोटात जळजळ होणे
सतत ढेकर येणे
अपचन
पौष्टिक आहारावर भर देणे आवश्यक...
अनेकांना तिखट खाण्याची आवड असते. मात्र तिखट अति प्रमाणात खाल्ल्यास अल्सर होण्याची शक्यता असते. एंडोस्कोपीने अल्सरचे निदान होते. यानंतर पातळ औषधे, गोळ्या असे पूर्णत: उपचार यावर शासकीय व खासगी दोन्ही यंत्रणांत उपलब्ध आहेत.
- डॉ. अनिलकुमार तराळे, सर्जन.
अल्सरवर लवकर निदान झाल्यास १०० टक्के उपचार शक्य आहे. शासकीय यंत्रणेतही याचे उपचार उपलब्ध आहेत. रुग्णांनी न घाबरता योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. यात मसालेदार व तिखट अति प्रमाणात सेवन केल्याने अल्सर होण्याची शक्यता असते.
- डॉ. समृद्धी काळपांडे, सर्जन.
काय काळजी घ्यावी...
अल्सर होऊ नये, याकरिता तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, मन शांत ठेवावे व योग्य पद्धतीचे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत.
- पोटातील अल्सरचे वेळेवर निदान केल्यानंतर व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेऊन मनस्थिती ठीक ठेवल्यास हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे.
- तिखट पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता नाही. मात्र त्यांचे प्रमाण नियंत्रणात असायला हवे. आहारातील तिखट पदार्थांचा समतोल व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे.