राज्यसेवेची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे थांबवा : श्वेता महाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:02 AM2021-03-13T05:02:44+5:302021-03-13T05:02:44+5:30
चिखली : ऐन तोंडावर आलेली राज्यसेवेची (एमपीएससी) पूर्व परीक्षा रद्द करून राज्य शासन विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आरोप आमदार ...
चिखली : ऐन तोंडावर आलेली राज्यसेवेची (एमपीएससी) पूर्व परीक्षा रद्द करून राज्य शासन विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आरोप आमदार श्वेता महाले यांनी केला आहे. यापार्श्वभूमीवर चिखलीत भाजप युवा मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने राज्य शासनाच्या विरोधात आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली ११ मार्च रोजी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी निदर्शने करून राज्य शासनाचा निषेध केला. १४ मार्च २०२० रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा राज्य शासनाने पुढे ढकलली आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी गेल्या एक-दोन वर्षांपासून एमपीएससीची तयारी करत आहेत. या विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता तसेच त्यांच्या भविष्याच्या विचार न करता ही परीक्षा पुढे ढकलली आहे. अन्य कार्यक्रम होत आहेत. केवळ परीक्षा पुढे ढकलून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान केले जात आहे. परीक्षा पुढे ढकलल्याने अनेक विद्यार्थ्यांचे नोकरीचे वयदेखील निघून जाणार असल्याचा आरोप योवळी करण्यात आला व राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात निदर्शने करण्यात आली.
कोरोना, लाॅकडाऊन यामुळे आधीच बेरोजगारी वाढलेली आहे, अशातच पुन्हा एकदा राज्य शासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत. ही परीक्षा पुढे ढकलल्यास ते बाद होतील. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा अंत न पाहता तत्काळ आपला निर्णय मागे घ्यावा आणि ठरलेल्या वेळापत्रकानुसार कोविडसंदर्भातला जो प्रोटोकॉल असेल त्यानुसार एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी आमदार श्वेता महाले यांनी केली आहे.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, सागर पुरोहित, विजय वाळेकर, सचिन कुलवंत, शंकर देशमाने, अक्षय भालेराव, सरचिटणीस सचिन कोकाटे, शंकर रुद्राकर, आयुष कोठारी, चैतन्य जोशी, प्रतीक पठ्ठे, प्रकाश पलभर, सुमित शिरसाट, गणेश लहाने, सागर घाडगे, तुषार राजपूत, प्रशांत जाधव, सतीश भुजबळ, अरविंद तोडकर आदी उपस्थित होते.