रेमडेसिविरचा राजकीय भेदभाव थांबवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:43 AM2021-04-30T04:43:57+5:302021-04-30T04:43:57+5:30
यासंदर्भाने कपिल खेडेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, जिल्ह्यात रेमडेसिविरचा काळाबाजार काही प्रमाणात थांबला असला, तरी सद्यस्थितीत ...
यासंदर्भाने कपिल खेडेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, जिल्ह्यात रेमडेसिविरचा काळाबाजार काही प्रमाणात थांबला असला, तरी सद्यस्थितीत हे इंजेक्शन मेडिकलऐवजी राजकीय पुढारी आणि लोकप्रतिनिधीच्या ताब्यात असल्याचे दिसून येत आहे. परिणामी गरजू रुग्णांना इंजेक्शन हवे असल्यास राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना फोन करून ते मिळवावे लागते. इंजेक्शनसाठी जेव्हा त्यांना फोन केला जातो तेव्हा समोरची व्यक्ती कोण आहे, हे जाणून घेतल्यानंतर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यातही केवळ दोनच इंजेक्शन आहेत. पण संबंधित विक्रेता जास्तीचे रुपये मागतो, अशी बतावणी करून २ ते ३ हजाराचे इंजेक्शन २५ ते ३० हजारांत विकले जात आहे, असा गंभीर आरोप खेडेकर यांनी केला आहे. ज्यांची आजी- माजी मंत्री, आमदार, खासदार व राजकीय पदाधिकारी आणि इतर मोठ्या लोकांशी ओळख आहे आणि पैसा बक्कळ आहे, अशांनाच सध्या इंजेक्शन मिळत असल्याने गोरगरीब जनतेचा कोणीच वाली राहिला नाही, वैद्यकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचारीसुध्दा माणुसकी विसरलेत. त्यामुळेच गोरगरीब रुग्णांना इंजेक्शन मिळत नाही. वेळेवर इंजेक्शन न मिळाल्याने अनेक गरीब रुग्ण दगावत आहेत. ती माणसे नाहीत का? यामध्ये घाणेरडे राजकारण करून काय मिळवणार आहात? हे त्वरित थांबवा, इंजेक्शनमधील भेदभाव व राजकारण थांबवून सर्वांना मुबलक प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध करून द्या, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल व गोरगरीब रुग्णांना इंजेक्शन देण्यास टाळाटाळ करणाऱ्याला चोप दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा तालुकाप्रमुख कपिल खेडेकर यांनी दिला आहे.