आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको
By admin | Published: June 30, 2016 01:01 AM2016-06-30T01:01:21+5:302016-06-30T01:01:21+5:30
प्रशासनाकडे दिले निवेदन; दोषींवर कारवाई करण्याची विविध संघटनांची मागणी.
बुलडाणा : मुंबई येथील दादरस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. सुलतानपूर येथे २९ जून रोजी भारिप-बमसंच्यावतीने काही वेळ व्यावसायिक बाजारपेठ व नागपूर-मुंबई महामार्गावर रास्तारोको आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच देऊळगावराजा शहरात धरणो आंदोलन करण्यात आले. बसस्थानक चौकात भारिप- बमसंचे जिल्हाध्यक्ष भाई दिलीप खरात, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.दिलीप झोटे, युवा भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष भाई दीपक कासारे, पीरिपाचे जिल्हा कार्याध्यक्ष विकास कासारे, आलम, भीमराव कंकाळ, अमोल झिने, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दीपक बोरकर, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष छगन खरात यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनात सहभागी होऊन निषेध नोंदविला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बांधवांसाठी उदात्त हेतूने आंबेडकर भवनाची निर्मिती केली होती; मात्र आकसबुद्धी ठेवत जातीयवाद्यांनी मध्यरात्रीची वेळ निवडून आंबेडकर भवन जमीनदोस्त केले. याप्रकरणी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करून शिक्षा देण्याची मागणी यावेळी पदाधिकार्यांनी केली.