Shivsena: रस्त्यावर येऊन दादागिरी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आवरा, दानवेंचा संताप
By निलेश जोशी | Published: September 16, 2022 06:31 PM2022-09-16T18:31:27+5:302022-09-16T18:32:41+5:30
बुलढाण्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात मांडली भूमिका
बुलढाणा: येणारा काळ हा संघर्षाचा आहे. सत्ताधारीच रस्त्यावर येऊन दादागिरी करत आहे. मुंबई, हिंगोली आणि बुलढाण्यात त्याचा प्रत्यय आला आहे. कायदा व सुव्यवस्था सत्ताधारीच खराब करत आहे. त्यामुळे प्रथमत: या सत्ताधाऱ्यांनाच आवरण्याची आज अवश्यकता आहे. ही दादागिरी आवरली नाही तर दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिले जाईल, अशी परखड भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी बुलढाण्यात मांडली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर प्रथमच ते बुलढाण्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाने आयोजित केलेल्या सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करत होते. स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात हा मेळावा झाला. गेल्या १५ दिवसापूर्वी बुलढाण्यात शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटातील राड्याच्या पार्श्वभूमीवर १६ सप्टेंबरच्या या मेळाव्याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागून होते. या मेळाव्यास जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा शिवसेना प्रमुख द्वय जालिंदर बुधवत, वसंतराव भोजने, सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, छनग मेहेत्रे, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, महिला आघाडीच्या चंदा बढे, तालुका प्रमुख लखन गाडेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान पुढे बोलतांना ना. आंबादास दानवे म्हणाले की, मुंबई, हिंगोली आणि बुलढाण्यात सत्ताधारीच दादागिरी करत आहे. आ. सदा सरवणकरसह अन्य काहींचे उदाहरन देत कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम या सत्ताधाऱ्यांकडूनच होत आहे. पोलिसही सत्ताधाऱ्यांच्या दबावात ते काम करत अवैध व्यवसायांना उत्तेजन देत आहेत. तर दुसरीकडे साथ दिली नाही म्हणून या सत्ताधाऱ्यांकडून ग्रामपंचायतींच्या चौकश्या लावल्या जात आहे. आम्हीही पालिकेतील अनधिकृत कारभाराची चौकशी लावू शकतो, असे दानवे पुढे म्हणाले. तसेच गद्दारांना गद्दार म्हणणार नाही तर काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गेल्या काळात आताचे उपमुख्यमंत्री व पुर्वाश्रमीचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोबण्याची भाषा करणारे आज आपल्या पोस्टवर त्यांचा फोटो लावत आहे. विचारधारेचा हा फरक आहे. शिवसेनेशी खेटण्याचा प्रयत्न करू नका. सत्ता येते सत्ता जाते. आज आपल्याजवळ येथे लोकप्रतिनिधी नसला तरी लोकप्रतिनिधी बनविणारी जनता आपल्या सोबत असतानाच शिवसेनेचा विचारही आहे. त्यामुळे येणारा काळ हा आपलाच असल्याचे दानवे म्हणाले.