भाऊ, दादा, अन् ताई, अक्का पैनगंगा नदीचे प्रदूषण रोका! वन्यजीव सोयरेचा पुढाकार
By ब्रह्मानंद जाधव | Published: September 24, 2023 05:45 PM2023-09-24T17:45:29+5:302023-09-24T17:45:39+5:30
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर येथील चिखली रोडवरील साखळी फाट्याजवळ पैनगंगा नदीलगत असलेल्या पुलावर निर्माल्य कुंड सज्ज करण्यात आले आहे.
बुलढाणा : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर येथील चिखली रोडवरील साखळी फाट्याजवळ पैनगंगा नदीलगत असलेल्या पुलावर निर्माल्य कुंड सज्ज करण्यात आले आहे. याठिकाणी भाऊ, दादा, अन् ताई, अक्का पैनगंगा नदीचे प्रदूषण रोका असा संदेशही दिला जात आहे. निर्माल्य वस्तू एकत्रित जमा करून नदीचे प्रदूषणापासून मुक्तता करण्यासाठी वन्यजीव सोयरेकडून पुढाकार घेण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या पैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पैनगंगा अभयारण्यातील वन्यजीवांना या प्रदूषणाने होत असलेले धोके लक्षात घेऊन मागील अनेक वर्षांपासून साखळी फाट्याजवळ पैनगंगा नदीलगत असलेल्या पुलाजवळ निर्माल्य वस्तू एकत्रित जमा करण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. नदीची प्रदूषणापासून मुक्तता करण्यासाठी वन्यजीव सोयरे यांच्याकडून पुलाजवळ तात्पुरते निर्माल्य कुंड २०१६ पासून दरवर्षी तयार करण्यात येते. हे निर्माल्य कुंड हरतालिका, गौरी पूजन, गणपती, नवरात्रात देवीचे विसर्जन याचा विचार करून तयार करण्यात येते. या वन्यजीव सोयरे यांनी निर्माण केलेल्या निर्माल्य कुंडला भाविक भक्तांकडून दरवर्षी प्रतिसाद मिळतो. यावर्षीच्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पैनगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य कुंड तयार करण्यात आले आहे. विसर्जनाच्या वेळी अनेक भाविक भक्त हार, फूल, दूर्वा, प्रसाद, अगरबत्ती, बेलाची पाने, कर्दळीची पाने, नारळ, कापूर, प्लास्टिक कचरा आदी कचरा पैनगंगा नदी पात्रात विसर्जित न करता वन्यजीव सोयरे निर्माण केलेल्या निर्माल्य कुंडमध्ये टाकावे जेणेकरून पैनगंगा नदीचे होणारे प्रदूषण रोखण्यास हातभार लागेल तसेच पैनगंगा अभयारण्यातील वन्यजीवांना होणारा त्रास रोखण्यासाठीदेखील हातभार लागेल.
श्रमदानातून उभारले कुंड
निर्माल्य कुंड तयार करण्यादरम्यान आलेल्या भाविक भक्तांना नदीमध्ये निर्माल्य न टाकू देता निर्माल्य कुंडमध्ये टाकायचे आवाहन केले. या मोहिमेला वन्यजीव सोयरे प्रा. डॉ. वंदना काकडे, जयंत हिंगे, श्याम राजपूत, श्रीकांत पैठणे, विशाल ढवळे, प्रल्हाद मकोडे आणि नितीन श्रीवास्तव यांनी श्रमदान केले. विशेष म्हणजे गड किल्ले अभ्यासक सागर काळे यांनी निर्माल्य कुंडची पाहणी केली.